कल्याण : पोलिसांना फुकटात चिकन तंदुरी न दिल्यानं पोलीस वारंवार त्रास देत असल्याचा गंभीर आरोप कल्याणच्या एका हॉटेल व्यावसायिकाने केला आहे. पोलीस त्याच्या हॉटेलमध्ये येऊन त्रास देत असतानाचा हा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला आहे.
कल्याणमध्ये राहणाऱ्या विजय सुर्वे यांचं कल्याण स्टेशन परिसरात स्वामी समर्थ नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये येऊन कल्याणच्या एमएफसी पोलीस ठाण्याचे काही पोलीस वारंवार त्रास देत असल्याचा सुर्वेंचा आरोप आहे. पण यामागचं कारण गंभीर आहे.
कारण कल्याणच्या एमएफसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या काही पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये येऊन चिकन तंदुरी मागितली. त्यावेळी आपण पोलिसांकडून पैसे मागितले. याचा राग आल्याने पोलीस आपल्याला वारंवार जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा सुर्वेंचा आरोप आहे.
राज्य सरकारच्या नियमानुसार खाद्यगृहे रात्री दीड वाजेपर्यंत उघडी ठेवायला परवानगी आहे. मात्र पोलीस हॉटेलमध्ये 12 वाजता येऊन हॉटेल जबरदस्तीनं बंद करायला लावतात आणि मारहाण करतात, असा आरोप सुर्वेंनी केला आहे. सुर्वे यांच्या हॉटेलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात पोलीस दीड वाजण्यापूर्वीच हॉटेल बंद करायला लावत असल्याचा प्रकार स्पष्टपणे कैद झाला आहे. त्यामुळं सुर्वे यांच्या आरोपांना बळ मिळालं आहे.
तर दुसरीकडे पोलिसांनी मात्र सुर्वेंचे आरोप फेटाळून लावले आहेत. सुर्वेंकडे महापालिकेचा परवाना नसल्यानं आपण कारवाई केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र महापालिकेचा परवाना संपला असेल, तर महापालिका कारवाई करेल, त्यात पोलिसांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुणी दिला? असा प्रश्न यानंतर उपस्थित झाला आहे. याप्रकरणी पोलिसांवर कारवाई झाली नाही, तर पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा सुर्वे यांनी दिला आहे.