मतविभाजन टाळण्यासाठी मनसेने एकत्र यावं : अजित पवार
एबीपी माझा वेब टीम | 12 Feb 2019 03:35 PM (IST)
लोकसभेत भाजप-शिवसेनेचा पराभव करायचा असेल तर धर्मनिरपेक्ष विचारधारा ठेवून एकत्र आलं पाहिजे.
मुंबई : आगामी निवडणुकीत मत विभाजन टाळण्यासाठी मनसेने एकत्र यायला हवं. एखाद-दुसऱ्या जागेसाठी ताणून धरु नये, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. तसंच राजू शेट्टींचे गैरसमज दूर करु, असंही अजित पवारांनी 'एबीपी माझा'सोबत बातचीत करताना म्हटलं. मनसेने एकत्र यावं "लोकसभेत भाजप-शिवसेनेचा पराभव करायचा असेल तर धर्मनिरपेक्ष विचारधारा ठेवून एकत्र आलं पाहिजे. मनसेनेही मागील वेळी एक लाख मतं घेतली होती. त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की, मागच्या गोष्टी मागे सारुन मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे," असं अजित पवार म्हणाले. VIDEO | मत विभाजन टाळण्यासाठी मनसेनं साथ द्यावी : अजित पवार | मुंबई | एबीपी माझा पार्थबाबत पक्षाने स्पष्ट केलेलं नाही पार्थ पवार मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले की, "आजकाल मुलं त्यांचा निर्णय स्वत: घेतात. पार्थबाबत पक्षाने अद्याप काहीही स्पष्ट केलेलं नाही. निवडणुकीच्या प्रचाराला फिरायला लागला म्हणजे निवडणूक लढवणार असं होत नाही." शिवसेना-भाजप युती होणार "शिवसेना आणि भाजप युती होणार हे नक्की. हे दबावाचं राजकारण आहे. बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी चर्चांचं सत्र सुरु आहे. ते हा मुद्दा ताणतील पण तुटू देणार नाहीत," असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.