डोंबिवली : डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलातली व्यायामशाळा सुरु राहणार आहे. निवडणुकीसाठी तीन महिने निवडणूक आयोगाने ही व्यायामशाळा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रस्त्यावर व्यायाम करत खेळाडूंनी केलेल्या गांधीगिरीनंतर आयोगाने निर्णय बदलला.


सावळाराम महाराज क्रीडा संकुलात असलेली व्यायामशाळा आणि जलतरण तलाव लोकसभा निवडणुकीच्या काळात तीन महिने बंद ठेवण्यात येणार होता. या जागेत ईव्हीएम मशिन्स ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रुम उभारण्यासाठी ही जागा ताब्यात घेतली जाणार होती. मात्र या निर्णयाविरोधात खेळाडूंनी रस्त्यावर व्यायाम करुन आपला निषेध नोंदवला.
डोंबिवलीत निवडणुकीसाठी व्यायामशाळा ताब्यात, रस्त्यावर व्यायाम करुन खेळाडूंकडून निषेध

खेळाडूंनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशाराही दिला होता. याची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी डोंबिवलीत धाव घेतली.

व्यायामशाळेच्या जागेऐवजी सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचं बेसमेंट निवडणुकीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यायी जागा उपलब्ध असतानाही व्यायामशाळेची जागा घेणाऱ्या अधिकाऱ्यांचीही जिल्हाधिकाऱ्यांनी कानउघाडणी केली. यामुळे डोंबिवलीकर खेळाडूंनी मात्र सुटकेचा निःश्वास सोडला आहे.