मुंबई एसटी को. ऑप. बँकेच्या आडून दहशतवादी प्रवृत्ती तयार करण्यासाठीचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. एसटी बँक एसटी कर्मचाऱ्यांच्या घामातून उभी राहिली आहे. बँकेत ज्या ठेवी आहेत त्यातील बहुसंख्य ठेवी ह्या एसटीचे कर्मचारी व निवृत्त कर्मचारी आणि अधिकारी यांच्या असून त्या सुरक्षित राहतील त्यात वृद्धी होऊन सभासदांना अधिक फायदे कसे देता येतील हे करण्यापेक्षा बँकेचा वापर दहशतवादी प्रवृत्ती तयार करण्यासाठी होत असून ते दहशतवादी प्रवृत्ती तयार करणार असतील तर बँक वाचविण्यासाठी आम्ही गांधीजी होण्यास तयार आहोत असा इशारा बँकेचे माजी सभासद आणि महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.


गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील कामगार संघटनेने काही महिन्यापूर्वी झालेल्या संचालकांच्या निवडणुकीत एकहाती विजय मिळवला. त्यानंतर बँकेतून मोठ्या प्रमाणावर ठेवी काढल्या जात असल्याची चर्चा आहे. त्यातच रिझर्व्ह बँकेनेदेखील एसटी बँकेवर कारवाई केली आहे. तर, दुसरीकडे बँकेच्या वार्षिक अहवालावर महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याचा फोटो छापण्यात आल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. महात्मा गांधी यांचे विचार संपुष्टात आले असून नथुराम गोडसेंचे विचार भारतीयांच्या मनात असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. त्यावर आता एसटी कर्मचारी संघटनांमध्ये चांगलीच जुंपण्याची चिन्हे आहेत.


गांधी विचाराची हत्या म्हणजे एसटीची हत्या...


राज्याच्या सर्वांगीण विकासात एसटीचा मोठा वाटा आहे. राज्यातील सर्व सामान्य माणसाचे एसटी हेच दळणवळणाचे मुख्य साधन आहे. महात्मा गांधीच्या संकल्पनेतील खेडी समृध्द करण्याचे काम एसटीने व एसटी कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्या कर्मचाऱ्यांच्या कष्टातून व घामावर उभ्या असलेल्या बँकेत गांधीजींचा सर्वसामान्य माणसाला समृध्द करण्याचा विचार सोडून त्यांच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या दहशतवाद्याची चित्रे छापून त्यांचा आदर्श घेऊन काम होणार असेल हे दुर्दैवी असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.


गांधीजींनी ग्रामीण विकासाला बळ दिले. कृषी ग्रामीण क्षेत्रातील उत्पादकता, गुंतवणूक, रोजगारनिर्मितीचे महत्त्व गांधीजींनी अधोरेखित केले होते. त्यांच्या कल्पनेप्रमाणे जर प्रत्येक गाव स्वयंपूर्ण झाले तर भारताला फार मोठा आर्थिक विकास साधणे शक्य होईल. शहरी भागातील विकासाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण खेड्यांकडे गेले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली होती. महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण विकासात एसटीचा मोलाचा वाटा राहिला आहे. दळणवळण, मुलांचे शिक्षण, महिलांसाठी सुरक्षित प्रवासाची हमी, आदी विविध गोष्टी एसटीमुळे शक्य झाल्या. गाव तिथे एसटी हे घोषवाक्य नाहीतर ग्रामीण जीवनात एसटीचे महत्त्व अधोरेखित करणारे वाक्य असल्याचे बरगे यांनी म्हटले.


सदावर्तेंच्या पॅनलमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेवर संकट


नव्या संचालक मंडळाने घेतलेले बँकेतील सभासदांच्या कर्जावरील व्याजदर हा 11 टक्क्यांवरून 7.5 टक्के करण्यात आला. तर कर्ज घेण्यासाठी दोन जामिनदारांची गरज लागणार नाही. हे निर्णय चांगले होते. पण ते टिकवण्यात संचालक मंडळ अपयशी ठरले असून त्यावर मार्ग काढण्याची गरज असताना दिशाभूल केली  जात आहे.असा आरोपही बरगे यांनी केला आहे.


बँकेत सध्या 2300 कोटी रुपयांची ठेवी आहेत. त्यातील 225 कोटी रुपयांच्या ठेवी काढण्यात आल्या असून सीडी रेशो 85 टक्क्यांच्यावर  गेला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर बँक अडचणीत येऊ शकते. त्याचा फटका सभासदांना बसू शकतो. त्यामुळे ठेवीदार आणि सभासद यांच्यात निर्माण झालेला संभ्रभ दूर करण्याऐवजी हे असले विनाशकारी निर्णय घेतले जात आहेत. जाब विचारणाऱ्याना  दमदाटी केली जात आहे. हे या पुढे सहन केले जाणार नाही असेही बरगे यांनी म्हटले आहे.