मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) वाहतूकीचा खोळंबा झाला असून वाहतूक ठप्पा झाली आहे. बदलापूर (Badlapur) आणि वांगणी (Wangani) स्थानकादरम्यान इंजिन बंद पडल्याने लोकलवर परिणाम झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान बिघाड झाल्याने कल्याणहून कर्जतकडे जाणारी लोकल वाहतूक मागील अर्ध्या तासापासून ठप्प झालीये. तर हे इंजिन बाजूला सारण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न कर्मचाऱ्यांकडून सुरु आहेत.
दरम्यान सायंकाळची वेळ ही नोकरदारांची घरी परतण्याची असते. त्यामुळे यावेळी लोकलमध्ये तुफान गर्दी असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच आता लोकलचा खोळंबा झाल्याने मध्य रेल्वेचं वेळापत्रक पुन्हा एकदा बिघडण्याची शक्यता आहे. तर लोकलसेवा पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
बदलापूर आणि वांगणी ही मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेची स्थानकं आहे. या दोन स्थानकादरम्यान एका इंजिनमध्ये बिघाड झालाय. त्यामुळे लोकल सेवा ही कर्जत स्थानकावरच थांबली आहे. मागील अर्ध्या तासापासून कोणतीही लोकल ही कर्जतच्या पुढे गेलेली नाही. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटलेली कर्जत लोकल ही या इंजिनच्या मागेच थांबली आहे. तर दरम्यान या इंजिनमध्ये नेमका कोणता बिघाड झाला हे अद्यापही समोर आलेले नाही. त्यामळे या इंजिनला बाजूला सारण्याचे प्रयत्न मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहेत.
सायंकाळची गर्दीची वेळ
मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. दररोज लाखो प्रवासी या मुंबई लोकलने प्रवास करुन आपल्या कार्यालयापर्यंत पोहचतात. त्यामुळे मुंबई लोकल ही मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सकाळी कार्यालयात पोहचण्याची वेळी आणि संध्याकाळी कार्यालयातून घरी परतण्याची वेळ ही मुंबई लोकलसाठी आणि मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे या वेळेत जर लोकलमध्ये काही बिघाड झाला तर मुंबईकरांचे बरेच हाल होतात.
अशीच काहीशी स्थिती आता निर्माण झाली आहे. यामुळे लोकलचं वेळापत्रक खोळंबलं असून आता मुंबईकरांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याचं चित्र आहे. तर कर्जत लोकल थांबल्यामुळे मागच्या बऱ्याच लोकलचा खोळंबा झाला आहे. तर आता हे इंजिन बाजूला सारण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. तर आता ही लोकलसेवा कधीपर्यंत पुर्ववत होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असून लोकलचं वेळापत्रक सुरळीत राहणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे.