मुंबई : माझगाव परिसरातील जीएसटी भवनाला आग लागली अन् काही तासातच तीन मजले जळून खाक झाले. जीएसटी भवनात असलेल्या अग्निशमन दलाने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु आग अग्निशमन सिलेंडर सुरू न झाल्याने आग भडकली. या कार्यालयात अग्निशमन दलाकडे असणाऱ्या वस्तू वापरात नसल्यामुळे, त्याची वेळेत देखभाल, दुरुस्ती न झाल्याने आणि या वस्तू वापरण्याचे प्रशिक्षण या विभागातील कर्मचाऱ्यांना नसल्यामुळे ही आग भडकल्याची खमंग चर्चा या विभागात सुरू झालीय.


जीएसटी भवनामध्ये 17 फेब्रुवारीला अडीच हजारांहून अधिक कर्मचारी काम करत होते. पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान नवव्या मजल्यावर अचानक धूर येऊ लागला आणि काही कळायच्या आत या मजल्यावर आग लागली. ही आग दहाव्या आणि आठव्या मजल्यावर ही पसरली. आग लागल्याची माहिती कर्मचार्‍यांनी या इमारतीच्या तळ मजल्यावर असणाऱ्या त्यांच्याच अग्निशमन विभागाला दिली. या विभागातील दोन अधिकारी आणि चार कर्मचारी ही आग विझविण्यासाठी प्रयत्न करू लागले. त्यांच्याकडे असणारं अग्निशमन सिलेंडर घेऊन कर्माचारी आग विझविण्यासाठी धडपड करू लागले. मात्र, अग्निविरोधक टाकीवर असणारी पिन आणि पट्टी दाबली जात नव्हती. त्यामुळे या सिलेंडरमधून अग्नी विरोधक द्रव्य बाहेर येत नव्हतं. प्रयत्न करूनही अग्निशामकाचे सिलेंडर उपयोगात येत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी हे प्रयत्न सोडले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केलं. इतर कर्मचार्‍यांनी भायखळा परिसरातील पोलीस ठाणे आणि अग्निशमन दलाच्या विभागाला या आगीची माहिती दिली होती. वर्दी मिळताच तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या जीएसटी भवनात दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवायला सुरुवात केली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कारण आगीनं आठवा, नववा आणि दहावा मजला आपल्या कवेत घेतला होता. साधारण अडीच ते तीन तास आगीने या तिन्ही मजल्यावरील साहित्य भस्मसात करून सोडलं.

जीएसटी भवनच्या आगीचे मनपात पडसाद, पायाभूत सुविधा कमी पडत असल्याची प्रशासनाची कबुली

जीएसटी भवनात स्वतःचं अग्निशमन दल -  

जीएसटी भवनात स्वतःचं अग्निशमन दल आहे. या दलामध्ये दोन अधिकारी आणि चार कर्मचारी तैनात आहेत. आगीची प्राथमिक माहिती मिळताच ही आग का विझवता आली नाही असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. यासंदर्भात जीएसटी भवनातील कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चाही सुरू आहे. काही कर्मचाऱ्यांनी आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर धक्कादायक माहिती दिली आहे. या विभागात अग्निशमन दल 1967 पासून कार्यरत आहे. मात्र, सध्या अग्निशमन दलात प्रशिक्षित अधिकारी आणि कर्मचारी नाहीत. दोन अधिकाऱ्यांना पूर्वी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. मात्र, सध्या चार कर्मचारी आहेत, त्यांना कोणत्याही पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. हे कर्मचारी 'आरे दूध डेरी' मध्ये पूर्वी काम करायचे. मात्र, तिथले अतिरिक्त कर्मचारी हा वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये मुरवण्यात आलेला आहे. त्यापैकी डेअरीत काम करणारे चार कर्मचारी सध्या जीएसटी भवनाच्या अग्निशमन दलामध्ये कार्यरत आहेत. मात्र, त्यांना या विभागात योग्य प्रशिक्षण दिलं नसल्यामुळे ते आज विझवण्यात कमी पडल्याचं याठिकाणी बोलले जात आहे.

GST Bhavan | जीएसटी भवनवर दहाव्या मजल्याचा भार; व्हीजेटीआयच्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून उघड

अग्निशमन दलातील कर्मचारी प्रशिक्षित नाही - 

अग्निशमन दलामध्ये तरुण कर्मचारी असावेत मात्र पन्नाशी गाठलेले कर्मचारी या विभागांमध्ये रुजू करण्यात आलेले आहेत. याचबरोबर या विभागाला देण्यात आलेल्या वस्तू यांची वेळेत देखभाल झालेलं नाही. त्या वापरातही नाहीत. त्यामुळे जेव्हा भवनाला आग लागली. त्यावेळी या वस्तूंचा कोणताही उपयोग झाला नाही. अशी माहितीही कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे. 3 एप्रिल 2014 मध्ये 1897 पदं भरली जावीत यासाठी आढावा मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र, या पदांची अद्यापही भरती झालेली नाही. यामध्ये अग्निशमन दलात भरती व्हावी अशी मागणीही करण्यात आलेली आहे. जीएसटी भवनात असणाऱ्या अग्निशमन दलामध्ये प्रशिक्षित कर्मचारी भरती केली गेले नाहीत. राज्य सरकारमधील महसूल देणारं सर्वात महत्त्वाचं कार्यालय म्हणून जीएसटी भवनाकडं पाहिलं जातं. अशा महत्त्वाच्या ठिकाणी अग्निशमन दलाची ही अवस्था असेल तर मग इतर विभागाबद्दल बोलायलाच नको, अशी अवस्था झालेली आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन राज्यातील प्रत्येक विभागात अग्निशमन दलाकडे किती प्रशिक्षित कर्मचारी आहेत. याची माहिती घेऊन तत्काळ या विभागात सुधारणा करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

GST Bhavan Fire | अग्नितांडवानंतपर जीएसटी भवनामध्ये आजपासून कर्मचारी अधिकारी पुन्हा कामावर रुजू, आगीत तीन मजले खाक