मुंबई : चिथावणीखोर वक्तव्य करणारे एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आलीय. मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात वारिस पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आम्ही 15 कोटी आहोत. मात्र, 100 कोटींवर भारी आहोत, असं चिथावणीखोर वक्तव्य वारिस पठाण यांनी कर्नाटकातील गुलबर्गा येथील जाहीर सभेत केलं होतं. या वक्तव्यानंतर अनेक पक्षातील नेत्यांनी वारिस पठाण यांच्यावर टीका केली. तर, अनेक ठिकाणी वारिस पठाण यांच्याविरोधात मोर्चे काढण्यात आले. दरम्यान, भायखळ्यात भाजप आज मोर्चा काढणार आहे.


वारिस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटायला सुरुवात झालीय. औरंगाबादेत पठाण यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर उतरलीय. वारिस पठाण यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून भाजपनं त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. या आंदोलनात आमदार अतुल सावे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. वारिस पठाण यांना तडीपार करा नाहीतर तुरुंगात टाका, अशी मागणी यावेळी भाजपनं केलीय. भाजपपाठोपाठ मनसेही आक्रमक झालीय. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. प्रकाश महाजन आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.

मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात वारिस पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अन्याय आणि भ्रष्टाचार विरोधात लढणाऱ्या 'संघर्ष' संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज म्हस्के यांनी ही तक्रार दाखल केलीय. वारिस पठाण यांच्या वक्तव्याने हिंदु आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींना भारी आहोत, एमआयएम नेत्याचे चिथावणीखोर वक्तव्य

काय आहे प्रकरण?
आम्ही 15 कोटी आहोत. मात्र, 100 कोटींवर भारी आहोत, असं चिथावणीखोर वक्तव्य एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलंय. इट का जबाब पत्थर से देना हम सिख गए है. एवढंच नव्हे, तर स्वातंत्र्य मागितल्यानं मिळत नाही तर हिसकावून घ्यावं लागतं. मुस्लीम समाजाला चिथवणारी वक्तव्य वारीस पठाण यांनी कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये केली आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात वारिस पठाण बरळलेत. विशेष म्हणजे यावेळी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी देखील उपस्थित होते. वारिस पठणांच्या वक्तव्यानं वाद उफाळण्याची चिन्ह आहेत.

वारीस पठाण यांच्या बोलण्याचा विपर्यास केला : इम्तियाज जलील
वारीस पठाण यांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलाय. त्यात तथ्य नाही. पंतप्रधान सगळ्यांचे आहेत, मग आमच्याकडे दुर्लक्ष का? आम्ही इतक्या दिवसांपासून सीएए विरोधात आंदोलन करतोय. मात्र, तुम्ही फक्त दुर्लक्ष करताय. भाषा वापरत असताना शब्दाचा वापर कसा करायचा हे आम्ही आमच्या लोकांना शिकवू. मात्र, मीडियाचा हा सिलेक्टिव्ह अॅप्रोच आहे. इतका जोश वारिस पठाण यांच्याबाबत दाखवता तितका अनुराग ठाकूर आणि योगी आदित्यनाथ यांच्याबाबत का दाखवत नाही? असाही सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला. वारिस पठाण यांच्या बोलण्याचं आम्ही समर्थन करत नाहीय. फक्त त्यांच्या बोलण्याचा अर्थ लोकांनी बदलला, ट्विस्ट केलं, आमच्या पक्षाचं धोरण स्पष्ट आहे. आम्ही सगळ्यांसोबत आहोत, त्यांच्या बोलण्याचे स्पष्टीकरण आम्ही त्यांना लिखित मागवू, पक्ष त्यांना याची विचारणा करेल, असं स्पष्टीकरण खासदार इम्तियाज जलील यांनी दिलंय.

Waris Pathan's Controversial Statement | वारिस पठाण यांना तडीपार करा, वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप आक्रमक