मुंबई :  रत्नागिरी किनार्‍यापासून सुमारे 41 मैल पश्चिमेला  बुडत असलेल्या जहाजातील 19 जणांना वाचवण्यात भारतीय तटरक्षक दलाला (Indian Coast Guard)  मोठे यश मिळाले आहे.  भारतीय तटरक्षक दलाने 18 भारतीय आणि 01 इथिओपियन मास्टरसह 19 जणांना मोटार टँकर जहाजातून यशस्वीरित्या वाचवले. 


रत्नागिरी किनार्‍यापासून सुमारे 41 मैल पश्चिमेला सकाळी 9 वाजून 23 मिनिटाला जहाज बुडत असल्याची माहिती मिळाली. हे जहाज यूएईच्या खोर फक्कन येथून न्यू मंगलोरला जात होते. जहाजातून मदतीचा कॉल मिळाल्यानंतर काही मिनिटांतच एमआरसीसी मुंबई कामाला लागली. ICGS सुजीत आणि ICGS अपूर्व या परिसरात आणि परिसरात गस्त घालणारी दोन तटरक्षक जहाजे अपघातग्रस्त जहाजाकडे वळवण्यात आली.  परिसरातील इतर व्यापारी जहाजांना सतर्क करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा नेट आणि NAVTEX सूचना देण्यात आली. तसेच सीजी प्रगत हेलिकॉप्टर या ऑपरेशन दरम्यान तैनात करण्यात आले. 


अॅस्फाल्ट बिटुमेन 3911 एमटी वाहून नेणाऱ्या जहाज सकाळी नऊच्या दरम्यान अचानक बुडत असल्याचे जहाजावरील क्रू मेंबर्सला निदर्शनास आले. जहाज पूर्ण बुडण्याची शक्यता असल्याचे पाहून क्रू ने जहाज सोडून दिले. त्याचवेळी तटरक्षक दलाकडून योग्य पद्धतीने बचाव कार्य करून या जहाजावरील 19 जणांची  सुखरुप सुटका केली आहे. त्यांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. सर्व कर्मचारी सुरक्षित असून सुरक्षेसाठी बोट किनाऱ्यावर आणली जात आहे. संकटाच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची धीरगंभीरता, तत्परता आणि व्यावसायिकता यामुळे आतापर्यंत 11 हजाराहून अधिक लोकांचे प्राण वाचले आहेत


सागरी तटरक्षक दल म्हणजेच (Indian Coast Guard) भारताच्या सागरी किनाऱ्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्थापन केलेलं लष्करी दल. या तटरक्षक दलाचे मुख्य कार्य म्हणजे सागरी किनाऱ्यावर अनधिकृत किंवा अनियमित असे काही आढळले तर त्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करणे असे आहे. सागरी तटरक्षक दलाचे मुख्य कार्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. याशिवाय या दलाचे चार प्रादेशिक विभाग असून, त्यांची मुख्यालये मुंबई, चेन्नई, पोर्ट ब्लेअर, आणि गांधीनगर येथे आहेत.


संबंधित बातम्या :