MHADA New House : मुंबई : मुंबईत (Mumbai News) घर घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न म्हाडा (MHADA) पूर्ण करतं. स्वस्तात मस्त घर अशी म्हाडाची ओळख. मात्र गेल्या अनेक वर्षांत म्हाडाची ही ओळख पुसत चालली आहे. नुकत्याच मुंबई म्हाडाच्या (Mumbai MHADA) लॉटरीत विक्रोळी (Vikhroli) येथे अनेकांना घरं लागली. मात्र, या घरांना पहिल्याच पावसात गळती लागल्याचं भीषण वास्तव पाहायला मिळतंय. या इमारतीच्या बांधकामात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे म्हाडामध्ये ज्यांना घर लागलंय, ते हैराण आहेत. यामुळेच आता म्हाडाच्या बांधकामावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.


2023 म्हाडा मुंबई लॉटरी मध्ये अनेक ठिकाणी घर निघाली होती. त्यामध्ये मुंबईतील विक्रोळी कन्नमवार नगर दोन येथे देखील 415 स्कीम हा म्हाडाचा एक प्रोजेक्ट झाला. त्यात अनेकांना घर लागली. म्हाडाचं घर लागल्यामुळे सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हे घर लॉटरीतील प्रत्येक विजेत्याला 40 लाख रुपयांना पडलं. मात्र, त्या बदल्यात विजेत्यांना घरात राहायला आल्यापासून फक्त आणि फक्त समस्यांचाच सामना करावा लागत आहे. एकीकडे पाणी न येणं, लिफ्टचा प्रॉब्लेम, पार्किंगचा प्रॉब्लेम सुरू होतेच. पण त्यात भर म्हणून आता पावसाळ्यांत घरांना गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे विक्रोळी 415 म्हाडा घर विजेत्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. 


कर्ज काढून मुंबईत घर घ्यावं, या दृष्टीनं आम्ही येथे अर्ज भरून घर घेतलं. मात्र, आमचा हिरमोड झाला आहे. घरात राहायला आल्यापासून अनेक समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागत आहे. पाणी प्रश्न, पार्किंग, लिफ्ट अशा अनेक समस्यांना आता सध्या आम्हाला सामोरं जावं लागतंय. यात आता पाऊस पडतोय आणि आमच्या सर्व घरांना लिकेज होऊ लागलं आहे. त्यामुळे घर घेतलं ही आमची चुकी झाली का? असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असा संताप रहिवाशी करत आहेत. 


तर काही रहिवाशी या म्हाडाच्या इमारतीच्या बांधकामावर प्रश्न उपस्थित करतात. पहिलाच पाऊस पडलाय, तीन विंगमध्ये सर्वच घरांमध्ये लिकेज पाहायला मिळतंय. आत्ताच ही परिस्थिती आहे, तर पुढे काय? ज्या बिल्डरनं ही घरं बांधली आहेत, त्याच्यावर म्हाडा प्रशासनानं चौकशी करून कारवाई करायला हवी. तसेच, आमच्या इमारतीची व्यवस्थित पाहणी करून काही प्रॉब्लेम होऊ नये, यासाठी उपाययोजना कराव्यात.


2023 कोकण बोर्डाच्या लॉटरीमध्ये ही घरं सर्वांना लागलेली आहे. स्कीम क्रमांक 415, पॉकेट फोर इमारतही आहे. इमारतीमध्ये तीन विंग आणि 258 घरं आहेत. सध्या शिर्के बिल्डरकडे या इमारतीचं वर्षभरासाठी मेंटेनन्स चार्ज आहे. नवीन म्हाडाच्या इमारतीमध्ये येणाऱ्या समस्यांसंदर्भात घर विजेते वारंवार बिल्डरकडे पत्रव्यवहार करत आहेत. मात्र, त्यांना बिल्डर प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता घर विजेते हे म्हाडा प्रशासनाकडे दाद मागणार आहेत. 


म्हाडाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही


विक्रोळी स्कीम क्रमांक 415 म्हाडा नव्या इमारतीमध्ये असणाऱ्या गळती प्रकरणी म्हाडा प्रशासनानं अद्याप कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही. विक्रोळी येथील नव्या घरांची ही परिस्थिती असेल, तर म्हाडाकडून राज्यभरात अनेक ठिकाणी देण्यात येणाऱ्या नव्या घरांची काय परिस्थिती असेल, हे विचार न केलेलंच बरं. या इमारतीच्या घटनेनंतर म्हाडामार्फत अनेक बिल्डरकडून अशाप्रकारे ढिसाळ बांधकाम होत असेल, तर म्हाडा प्रशासनानं यासंदर्भात दखल घेऊन योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे, असं म्हाडा घर विजेते आणि लॉटरीसाठी अर्ज करणारे सांगतात. एकूण इमारतीतील 70 टक्के फ्लॅट्समध्ये गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच नागरिक खूपच त्रस्त झाले आहेत.