मुंबई: कोरोनाचे बदलत असलेले रुप, समोर येऊ लागलेले डेल्टा व्हेरियंटसारखे नवीन प्रकार आणि त्यामुळं राज्यभरात पुन्हा एकदा घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या तिसऱ्या सेरो सर्व्हेमध्ये (Mumbai third sero survey) 50 टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. मुंबईतील 24 वॉर्डमध्ये मे आणि जून महिन्यात 6 ते 18 वयोगटांतील लहान मुलांचा सर्व्हे केला होता. 


तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर सेरो सर्व्हेचा हा निकाल आशादायक मानला जात आहे. या सर्व्हेसाठी एकूण दहा हजार मुलांचे नमुने घेण्यात आले होते, अशी माहिती आहे. 


महानगरपालिकचे  अतिरिक्त आयुक्त  सुरेश काकानी म्हणाले की,  मुंबईत 18 वर्षाखालील मुलांची सेरो सर्वेची मोहीम हाती घेतली होती.   1 एप्रिल ते 15 जून दरम्यान पालिकेच्या 24 वार्डात लहान मुलांचे सॅम्पल कलेक्ट केले. त्यामध्ये असं समजलं की 50 टक्क्यांपेक्षा अधिक मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार झालेले आहेत . सर्व्हे केल्यानंतर अभ्यास केला असता त्यामध्ये असं समजलं की मुलांमध्ये अँटी बॉडीज तयार आहेत.  प्रत्येक वार्डमधून 100 मुलांचे सॅम्पल घेतले यामध्ये कोणतेही निकष ठेवले नव्हते. अँटीबॉडीज तयार झाल्या ही आनंदाची बाब आहे, असं ते म्हणाले. सुरवातीला एक सर्व्हे केला होता तेव्हा 21 टक्के होता पण आता 50 च्या वर गेला आहे.  हे असं असलं तरी आम्ही कोरोनाशी लढाई लढणार आहोत. कोणतीही तडजोड आपण करणार नाही. लहान मुलांसाठी जी सेंटर आहेत ती अशीच राहतील तयारी पूर्ण असेल, असं ते म्हणाले. 


ककानी यांनी सांगितलं की, तज्ञ मंडळी जरी वेगळे निकष लावत असतील तरी आपली तयारी कायम असणार आहे. आपल्यातकडून कोणतीही तडजोड केली जाणार नाही.


लहान मुलांच्या लसीकरणाबाबत ते म्हणाले की, केंद्राकडून जे सूचना येतील त्याचे पालन केले जाणार आहे.  18 वर्षांवरील लसीकरणाबाबत ते म्हणाले, जसजसा साठा आपल्याला मिळाला तर आपण जोमाने लसीकरण करतोय. कोल्ड स्टोरेज उपलब्ध आहेत. लस मिळत जाईल तस लसीकरण केले जाईल.


कोरोनाचे वाढते विषाणू तपासण्यासाठी लॅब आपण उपलब्ध करत आहोत. दोन आठवड्यात ही लॅब पूर्ण काम करेल.  कस्तुरबा रुग्णालयात ही लॅब कार्यरत असेल या लॅबच काम पूर्ण होईल, असं ते म्हणाले.


डेल्टा प्लससंदर्भात बोलताना ते म्हणाले, डेल्टा प्लसचा 1 रुग्ण आढळला आहे. जे कोरोनाचे नियम आहेत ते नियम पाळावे मग आपण कोणत्याही आजारावर मात करू.


 



इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची कोरोना रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचा निष्कर्ष


एप्रिलमध्ये झालेल्या एका सर्व्हेमध्ये मुंबईतील इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची कोरोना रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचा निष्कर्ष तिसऱ्या सेरो सर्व्हेतून समोर आला होता. तर दुसरीकडे  झोपडपट्टी रहिवाशांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असल्याचं समोर आलं होतं. यासाठी 24 विभागांमध्ये दहा हजारांहून अधिक लोकांचा सर्व्हे करण्यात आला होता.