मुंबई : राज्यात अचानक महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि काँग्रेस सत्तेत आली. पण सरकार येऊन दीड वर्ष होऊनही काँग्रेस मंत्र्यांचं नाराजीनाट्य मात्र संपत नाही असं चित्र आहे. याचं उदाहरण आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार. नुकत्याच झालेल्या ओबीसी आरक्षणाच्या शिबिरात मी ओबीसी असल्यामुळे मला महसूल खात मिळाले नसल्याची खंत त्यांनी सार्वजनिकरित्या बोलून दाखवली.


2019 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था बिकट होती. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील पक्ष सोडून भाजपमध्ये गेले होते. अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केले. काँगेसचे 20 आमदार येणार नाही असा दावा भाजप करत होती. निवडणुकांमध्ये काँग्रेसने 44 जागा जिंकल्या. अशात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग झाला. काँग्रेसने सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये त्यांचा प्रवेश झाला.


हे सरकार येऊन आता दीड वर्ष झाली तरी काँग्रेस मंत्र्यांची अजूनही नाराजी मात्र संपत नाही. आपल्याला निधी मिळत नाही, राज्यमंत्र्यांना अधिकार मिळत नाही. काँग्रेससाठी महत्त्वाच्या विषयांची अंमलबजावणी होत नाही यावर काँग्रेसने वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे.


विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर त्यांना आधी भूकंप पुनर्वसन हे खातं देण्यात आलं होतं. त्यावरुन ते नाराज होते. चार दिवस खात्याचा कार्यभार स्वीकारला नाही. त्यानंतर त्यांना मदत आणि पुनर्वसन खातं दिल्यावर त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यातही ओबीसी मंत्रालायत आपल्या खात्यात कर्मचारी नाहीत. दुसऱ्या खात्यातील लोकांवर काम सुरु आहे. याबाबत ही त्यांनी खंत व्यक्त केली होती. आता तर थेट ओबीसी असल्यामुळे महसुलासारखं महत्त्वाचं खाते मिळालं नसल्याचं त्यांनी जाहीर करुन टाकलं.


महसूल मंत्रिपद न मिळाल्याची खदखद व्यक्त करणाऱ्या वडेट्टीवारांना थोरात यांचा सबुरीचा सल्ला


विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र त्यांना सांभाळून घेत वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला असं म्हटलं. इतकंच नाही तर विजय वडेट्टीवार यांचं वय बघता त्यांना राजकीय कारकिर्दीत अजून मोठी जबाबदारी मिळेल अस सांगत सबुरीचा सल्ला दिला.


एकीकडे नितीन राऊत पदोन्नतीमध्ये आरक्षणावरुन काँग्रेस नेत्यांची तक्रार करतात तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार आपल्याच पक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत की ते ओबीसी असल्यामुळे त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे एकूणच काँग्रेसमधील नाराजीनाट्य काही संपत नसल्याचं चित्र आहे. आपल्याच पक्षातील नेत्यांना काँग्रेसचे नेते अडचणीत आणत असल्याचं चित्र आहे.