मुंबई : भारतात स्ट्रोक अर्थात पक्षाघात हे मृत्यू किंवा अपंगत्वाचं प्रमुख कारणांपैकी समजलं जातं. वेळीच उपचार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागतात किंवा आयुष्यभराचं अपंगत्व स्वीकारावं लागलं. पक्षाघाताच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. अशाच घटनांवर योग्य उपचारांसाठी मुंबईत 'गोल्डन अवर' सेवा सुरु करण्यात आली आहे. मुंबईत 108 इमरजन्सी अॅम्बुलन्स सेवेत उपस्थित डॉक्टरांना पक्षाघात झालेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं आहे. 'गोल्डन अवर' सेवा मुंबईच्या परेलमधील ग्लोबल हॉस्पिटल आणि मुंबई स्ट्रोक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आली आहे. या रुग्णालयातील 108 इमरजन्सी अॅम्बुलन्स सेवा देणाऱ्या 230 डॉक्टरांना स्ट्रोकबाबत जागरुक करण्यात आलं आहे. सर्व 230 डॉक्टरांना प्रशिक्षणादरम्यान पक्षाघात झालेल्या रुग्णाच्या हात, पाय आणि बोलण्याच्या क्रियेत अडचणी आल्या तर त्यांना कशी मदत करायची याचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं आहे.


ग्लोबल रुग्णालयाने सुरु केलेल्या या सेवेत डॉक्टरांची संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेही उपस्थित होता. ग्लोबल रुग्णालयाचे स्ट्रोक आणि न्यूरोक्रिटिकल केअरचे प्रादेशिक संचालक डॉ. शिरीष हस्तक यांनी स्ट्रोकबाबत अतिशय सोप्या भाषेत याबाबत माहिती दिली.

डॉ. शिरीष हस्तक यांच्या माहितीनुसार, "स्ट्रोकनंतर 4.5 तासांचा अवधी अतिशय महत्त्वाचा असतो. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात 937 इमरजन्सी अॅम्बुलन्स आहेत आणि सुमारे 2600 बी.ए.एम.एस किंवा बी.यू.एम.एस डॉक्टर आहेत. मुंबईत जवळपास 112 अॅम्बुलन्स आहेत आणि डॉक्टरांना अॅडवान्स्ड लाईफ सपोर्ट, बेसिक लाईफ सपोर्ट आणि  आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशिक्षित केलं जातं. रुग्णाजवळ घटनास्थळी पोहोचण्याचा सरासरी वेळ (सूचना मिळाल्यानंतर) 18.75 मिनिटं आहे. तर रुग्णाला घटनास्थळावरुन रुग्णालयात पोहोचवण्यासाठी लागणारा सरासरी कालावधी 26.25 मिनिटांचा आहे. हे प्रशिक्षण सत्र मुंबईला स्ट्रोक स्मार्ट बनण्यासाठी आणि गोल्डन अवरदरम्यान हात, पाय आणि बोलण्याच्या क्रियेवर परिणार होण्यापासून वाचवण्यासाठी मदत करेल."

पक्षाघात कधी होतो?
सामान्यत: मेंदूला रक्ताचा पुरवठा कमी झाला किंवा त्यात अडचणी आल्या तर एखाद्याला पक्षाघात होऊ शकतो. यामुळे मेंदूच्या भित्तिकांना ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळण्यात अडचणी येतात. अशाप्रकारणे काही मिनिटातंच मेंदूच्या पेशींचं कार्य बंद होतं. हे एक मेडिकल इमरजन्सी आणि त्यावर तातडीने उपचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे ग्लोबल रुग्णालयाने रुग्णाच्या उपचारांसाठी 'गोल्डन अवर' सेवा सुरु करण्याचा विचार केला आणि ती प्रत्यक्षात आणली.