ठाणे: तृतीय पंथीयांना शासकीय कोट्यात एक टक्का आरक्षण द्या, अशी मागणी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्रही दिलं आहे.


तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं महापौर मीनाक्षी शिंदेंचं म्हणणं आहे.

तृतीयपंथी म्हटलं की आपल्यासमोर चित्र उभं राहतं ते सिग्नलवर, रेल्वेत किंवा एखाद्या बाजारपेठेत टाळ्या वाजवून पैसे मागणाऱ्या आणि उपेक्षित जीवन जगणाऱ्या जमातीचं. त्यांना सहानुभूती सगळेच दाखवतात, पण जवळ मात्र कुणीही करत नाही.

चीड, धिक्कार, किळस, सहानुभूती अशा अनेक भावनांचे कटाक्ष झेलणाऱ्या तृतीयपंथीयांसाठी ही मागणी म्हणजे जणू वाळवंटात दिसलेला जलाशयच.

अलीकडेच तृतीयपंथीयांना निवडणुकीत मतदान करण्याचाही अधिकार देण्यात आला आहे. पण तो देखील केवळ राजकीय फायद्यापोटीच असल्याचा तृतीयपंथीयांचा आरोप आहे. कारण मतदान करताना नागरिक असलेल्या या तृतीयपंथीयांना नागरिक म्हणून जगण्याचाही अधिकार असला, तरी उपजीविकेचं हक्काचं साधन मात्र उपलब्ध नाही. आणि त्यामुळंच अगदी देहविक्रय करण्यापर्यंतची वेळ तृतीयपंथीयांवर आली आहे.

या सगळ्यातून तृतीयपंथीयांना बाहेर काढून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावं, आणि त्यांनाही सन्मानानं जगता यावं, यासाठी ठाणे महापालिकेच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.

तृतीयपंथीयांना शासकीय कोट्यात १ टक्का आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांची ही मागणी मान्य झाली, तर शासकीय कार्यालयं, आणि सर्वच सरकारी विभागात काम करण्याची संधी तृतीयपंथीयांना मिळू शकते.

महापौरांच्या या मागणीचं तृतीयपंथीयांनी स्वागत केलं आहे. आजवर आम्हाला प्रत्येकानं निव्वळ वापरुन घेतलं, पण जवळ कुणीही केलं नाही. त्यामुळं महापौरांची ही मागणी आमच्यासाठी चांगली असल्याचं मत तृतीयपंथींनी व्यक्त केली.

शिवाय आम्हाला अनेक लोक आश्वासनं देतात, मात्र वेळ आली की साधं जवळ बसूही देत नाहीत. त्यामुळं आम्हाला शासकीय कोट्यात आरक्षण मिळाल्यास हक्कानं आणि सन्मानानं जगता येईल, असं तृतीयपंथीयांचं मत आहे.

तृतीयपंथी हे आजवर सेवा देण्याचं काम करत आलेत, त्यामुळं यापुढेही लोकांची सेवा होईल, असं काम करण्याची संधी मिळाल्यास ते काम तृतीयपंथी आनंदानं स्वीकारतील, असा किन्नर आखाड्याचा विश्वास आहे.

तृतीयपंथीयांना सन्मानानं जगण्यासाठी त्यांना हक्काचा रोजगार गरजेचा आहे, आणि तो मिळाला, तर खऱ्या अर्थानं तृतीयपंथी मुख्य प्रवाहात येऊ शकणार आहेत.