मुंबई : मुंबईत धावत्या लोकलमधून उतरणं दिल्लीकर नृत्य प्रशिक्षकाला चांगलंच महागात पडलं आहे. डान्स स्पर्धेसाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या 28 वर्षीय अविनाश विजय दुग्गलला मालाड रेल्वे स्थानकावर अपघात झाला.

अविनाश दिल्लीहून आपल्या 17 विद्यार्थ्यांसह नृत्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आला होता. अक्सा बीचजवळ प्रॅक्टिस करुन सर्व जण गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास परत येत होते. मालाडच्या फलाट क्रमांक दोन वरुन सर्वांनी लोकल पकडली.

नजर चुकीने अविनाश महिलांसाठी आरक्षित डब्यात चढला. चूक झाल्याचं लक्षात येताच त्याने धावत्या लोकलमधूनच उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फलाटावर घसरत लोकलखाली आला.
'ट्रेनमध्ये चढता-उतरताना प्रवाशाचा मृत्यू झाल्यास रेल्वे भरपाई देणार'

अविनाशला उपचारासाठी कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केलं असून त्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे. रुग्णालयात त्याला योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप त्याच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

अविनाशचा 'थ्री डी डान्स ग्रुप' मुंबई आणि नवी मुंबईत सुरु असलेल्या 'इंडियन हिप हॉप डान्स' स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत पोहचला आहे.

दरम्यान, ट्रेनमध्ये चढता-उतरताना पडून एखादा प्रवासी जखमी किंवा मृत्युमुखी पडला, तर त्याच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल, असं सुप्रीम कोर्टाने दोनच दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं.