ठाणे : महानगर पालिकेला असलेली वाढीव पाण्याची गरज लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यात असलेले बारवी धरण महानगरपालिकेला विकत घेऊ द्यावे अशी मागणी ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने पालिकेला अनुदान आणि कर्ज देण्यास मदत करावी अशी मागणी त्यांनी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.
ठाणे महानगरपालिका अस्तित्वात येऊन अनेक दशके उलटली असली तरी अजूनही ठाणे महानगरपालिकेचे स्वतःचे धरण नाही. हा धरणाचा मुद्दा पालिका निवडणुकांपासून ते खासदारकीच्या निवडणुकांपर्यंत नेहमीच राजकारण तापवतो. गेल्या काही वर्षात ठाण्यामध्ये मोठी गृहसंकुले निर्माण झाली असल्यामुळे लोकसंख्येत देखील प्रचंड वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या आणि एमआयडीसीच्या धरणांमधून ठाणे महानगरपालिकेला पाणी विकत घ्यावे लागते. हा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी एमआयडीसी च्या अंतर्गत असलेले बारवी धरण ठाणे महानगरपालिकेला हस्तांतरित करावे अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या मागणीचे एक पत्र त्यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना दिले आहे.
सद्यस्थितीत बारवी धरणातून एम.आय.डी.सी. मार्फत उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणो आणि मिरा-भाइर्दर महानगरपालिकेस तसेच औद्योगिक क्षेत्रात पाणी पुरवठा होतो. या धरणाची उंची मागील वर्षापासून वाढविल्यामुळे अतिरिक्त पाणी साठा निर्माण झाला आहे. वाढीव उंचीनुसार बारवी धरणाची पाणी साठवण क्षमता अंदाजे 932 दशलक्ष लीटर असून त्यापैकी ठाणे महानगरपालिका 110 दशलक्ष लीटर पाणी पुरवठा घेत आहे. हा पाणीसाठा एम.एम.आर. रिजनमधील महानगरपालिकेच्या वाढत्या लोकसंख्येसाठी उपयोगी पडून ठाणे महानगरपालिका इतर महानगरपालिकांना पाण्यासाठी सहकार्य करु शकणार आहे. त्यात सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेचे कोणतेही स्वत:चे धरण नसल्यामुळे इतर संस्थेवर पाण्यासाठी अवलंबून रहावे लागत आहे. बारवी धरण हे एम.आय.डी.सी.च्या मालकीचे आहे. परंतू राज्यामध्ये कुठेही धरणाचे पाणी महापालिकांना विकण्याची जबाबदारी ही एम.आय.डी.सी.ची नसते. तर फक्त त्यांच्या लघुउद्योगांना व उद्योगांना पाणी पुरवठा करण्याचे काम एम.आय.डी.सी. करते, परंतू बारवी धरणातून मात्र प्रमुख्याने उद्योगांपेक्षा महानगरपालिकांनाच जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे लागते. ज्याप्रमाणो नवी-मुंबई महानगरपालिकेने मोरबे धरण विकत घेऊन त्यांचा पाणी प्रश्न सोडविला त्याच धर्तीवर बारवी धरण राज्य शासनाने महापालिकेला विकत द्यावे. त्यासाठी महापालिका स्वत:चा निधी व काही राज्य शासनाकडून अनुदान व काही कर्ज उपलब्ध करून नक्कीच बारवी धरण विकत घेईल अशी मागणी सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :