मुंबई : हिंदी चित्रपटात काम करण्याच्या उद्देशाने बंगळूरवरून आपल्या कुटुंबाला न कळवता मुंबईत पळून आलेल्या दोन मुलींना मुंबईमधील रिक्षा चालकाच्या समयसूचकतेमुळे पुन्हा आपल्या कुटुंबाला सुखरूप परत भेटता आले आहे.


मुंबईत रोज चित्रपटात काम करण्याच्या उद्देशाने हजारोच्या संख्येने देशभरातून तरुण तरुणी आणि अल्पवयीन मुले येत असतात. यातील काहीजण यशस्वी होतात तर काहींची मात्र या मायनगरीत फसवणूक होऊन त्यांचे आयुष्य उध्वस्तही होते. परंतु अनेकदा याच मुंबईत अजूनही माणुसकी जिवंत असल्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहे. बंगळूरवरून दोन अल्पवयीन मुली घरी न सांगता कोईमतूर एक्सप्रेस रेल्वेने मुंबईतील कुर्ला एलटीटीला 12 फेब्रुवारीला आल्या होत्या. एलटीटीला प्रीपेड रिक्षा सेवा सुरू झाली असल्याने त्या ठिकाणी येऊन अंधेरीला जाण्यासाठी या मुलींनी जितेंद्र ऊर्फ सोनू यादव यांची रिक्षा घेतली.

रिक्षाचालक सोनू त्यांना घेऊन अंधेरी लोखंडवाला येथे तिरुपती टेलीफिल्म कार्यालयासमोर गेले. तिथे ते कार्यालय बंद होते, त्यांनी तिथून एकाला वारंवार फोन करून देखील तो फोन बंद होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या मायनगरीत आता आपण काय करणार? या विचाराने आणि भीतीने त्यांना रडायला आले, त्या प्रचंड घाबरल्या. हे सर्व प्रकरण त्यांना तिथे सोडलेले रिक्षा चालक पहात होता. त्या रडायला लागल्यावर त्यांची त्या रिक्षा चालकाने विचारपूस केली तेव्हा त्यांनी आपण घरी न सांगता मुंबईत आल्याचे त्याला सांगितले. या मुलींची कहाणी ऐकून हाच रिक्षाचालक देवदूत बनत त्या मुलींना परत लोकमान्य टिळक टर्मिनसला घेऊन आला. जितेंद्र उर्फ सोनू यादव ने तिथे आल्यावर त्याचा मित्र गुलाब गुप्ता याला या मुलींविषयी सर्व हकीकत सांगितली. त्या दोघांनी मिळून पैसे जमा केले आणि दोन्ही मुलींना जेवू घातले. त्यानंतर त्यांना रात्रीच्या कोईमतूर ट्रेनचं तिकीट काढून रेल्वेत बसून दिले. या दोन्ही मुली 13 फेब्रुवारी ला सुखरूप घरी पोहचल्या.

Prepaid Auto Rickshaw | मुंबईमध्ये प्रथमच प्रीपेड रिक्षा सेवा सुरु | ABP Majha



दोन्ही मुलींच्या वडिलांनी रिक्षाचालक जितेंद्रला फोन करून त्यांचे आभार मानले. मुलीच्या वडिलांनी बंगळूर पोलीसात मुली बेपत्ता झाल्याची तक्रार देखील दिली होती. 2013 मध्ये याच एलटीटीवरून एका युवतीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. परंतु प्रामाणिक रिक्षाचालकांच्या प्रसंगावधनाने अशी घटना टळली असेच म्हणावे लागेल. या रिक्षाचालकांनी दाखविलेल्या ता माणुसकीचे कौतुक म्हणून महाराष्ट रिक्षा चालक संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र देसाई आणि लोकमान्य टिळक टर्मिनसचे स्टेशन डायरेक्टर एस एस सोनावणे यांनी या दोन्ही रिक्षा चालकांचा सत्कार केला.

आपल्यातील एका रिक्षाचलकाचा असा सन्मान होतो हे पाहून इतर रिक्षाचालकानी देखील अभिमान वाटला.एकीकडे मुंबई मधील रिक्षाचालकांची अरेरावी बाबत वारंवार तक्रारी येत असताना एलटीटीवरील रिक्षा चालकांनी मात्र आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह चार मुलींची सुटका

मुंबईत 'वाईफ स्वॅपिंग'चा धक्कादायक प्रकार उघड, पीडित महिलेच्या पतीसह एकाला अटक