मुंबई : मुंबईत एका मानसिक आणि शारिरीक आजारानं त्रस्त महिलेनं आपल्या पतीविरोधात लैंगिक छळाची तक्रार नोंदवली आहे. मुंबई पोलिसांनी पती आणि इतरांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यावरून हा वाईफ स्वॅपिंगचा धक्कादायक प्रकार असल्याचं समोर आलं आहे. तसेच पीडित महिलेनं पतीविरोधात अनैसर्गिक शारिरीक संबंधांसाठी जबरदस्ती केल्याचाही आरोप केला आहे.  जिग्नेश असं या पीडितेच्या आरोपी पतीचं नाव आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर  पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बोरीवली कोर्टनं त्याला 23 डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, 39  वर्षीय पीडित महिला ही डिसलेक्सिया या आजारानं ग्रस्त आहे. साल 2004 मध्ये या महिलेचा जिग्नेश नावाच्या शेअर बाजारात कार्यरत असलेल्या व्यक्तीशी झाला होता. लग्नानंतर अनेक वर्ष तिनं कौटुंबिक हिसंचार सहन केला. आपल्या दोन मुलांच्या भविष्याचा विचार करून पीडित महिलेनं जिग्नेशचा हा छळ सहन केला. मात्र साल 2017 पासून जिग्नेशनं परपुरूषांशी शारिरीक संबंध ठेवण्यास आपल्याला भाग पाडलं. तसेच या संबंधांचे व्हिडीओ बनवून कुणाकडेही याची वाच्यता न करण्याची धमकी दिली होती असा आरोप पीडितेच्या वतीनं करण्यात आला आहे. यासाठी जिग्नेश सोशल मीडिया साईट्सचा उपयोग करायचा. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप यासाठी सक्रिय असलेल्या ग्रुपमध्ये जिग्नेश बनावट अकांऊंट्ससह सहभागी होता याचे काही पुरावेही सापडले आहेत.

साल 2016 मध्ये पीडित महिलेच्या सासूचं निधन झाल्यानंतर हे प्रकार सुरू झाले. सासऱ्यांकडे याची तक्रार केली मात्र त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही, असा पीडितेचा आरोप आहे. मात्र गेल्या दोनवर्षात हे प्रकार वाढल्यानं पीडित महिलेनं अखेरीस तिच्या माहेरच्यांना या अत्याचारांची माहिती दिली. त्यानंतर अॅड. स्वप्ना कोदे यांच्या मदतीनं पीडितेनं मुंबई पोलिसांत याची तक्रार दाखल केली.

मुलुंड पोलिसांकडून हे प्रकरण कांदिवलीतील समता नगर पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी जिग्नेशला पोलिसांनी अटक केली असून बोरीवली कोर्टनं त्याला 23 डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी अन्य एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.