मुंबई : ध्वनी प्रदूषण करुन पर्यावरणाला हानी पोहचवणाऱ्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने समज देण्यासाठी न्यायालयाने अनोखी शिक्षा सुनावली आहे.न्यायालयाच्या आवारातच वृक्षारोपण करण्याची अनोखी शिक्षा गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने गणेश मंडळांना सुनावली आहे. या शिक्षेचे स्वागत करत अनेक गणेश मंडळांनीही कोर्टाचे आदेश शिक्षा म्हणून स्वीकारले आहेत.


सार्वजनिक उत्सवांमध्ये होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. यानुसार पोलिसांनी कारवाई केली, या कारवाईत दक्षिण मुंबईतील सुमारे 39 गणेश मंडळांविरोधात पर्यावरण सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. या सर्व मंडळांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी गिरगाव कोर्टातील महानगर दंडाधिकारी अनुष्का रहाणे यांच्यापुढे हजेरी लावली.


या मंडळांनी पर्यावरण कायद्याचा कलम 15 च्या तरतुदींचा भंग केला असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. या गुन्ह्यासाठी सर्व मंडळांना पाच हजार रुपयांचा दंड न्यायालयाने सुनावला. तसेच यामध्ये पर्यावरण कायद्याचा समावेश असल्यामुळे सर्व मंडळांनी प्रत्येकी रोप न्यायालयाच्या आवारात लावावे, असे आदेशही न्यायालयाने दिले. यावेळी हजर असलेल्या मंडळांपैकी सुमारे 30 मंडळ प्रतिनिधींनी तात्काळ बाहेर जाऊन कुंडीतील एक-एक रोपटे विकत आणले आणि ते न्यायालयात जमा केले. यामध्ये गुलाब, जास्वंद, तुळस, लिंबू आदी रोपांचा समावेश आहे.


या कुंडीवर संबंधित मंडळाचे नाव लिहिण्यात आले होते आणि त्यासह ते न्यायालयात जमा करण्यात आले. न्यायलयाच्या आवारात जमा झालेली सर्व रोपे ठेवण्यात आली असून लवकरच त्यांचे रितसर रोपण केले जाईल, असं कोर्ट कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.


गणेश उत्सव मंडळ, बाल गणेश मंडळ, महालक्ष्मी गणेश मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव आदी मंडळांचा यामध्ये समावेश आहे. या मंडळांनी दंडाची रक्कमही न्यायालयात जमा केली आहे. मुंबई पोलिसांनी या मंडळांवर केलेल्या या कारवाईच्या अधिक तक्रारी या विसर्जनाच्या दिवशीच्या होत्या.