मुंबई : कर्नाटक, गोव्यापाठोपाठ महाराष्ट्रातील काँग्रेसलाही लवकरच मोठी खिंडार पडण्याची चिन्ह आहेत. राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. अशा परिस्थितीत अनेक आमदार भाजपा-शिवसेनेच्या संपर्कात असल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला राज्यात मोठं यश मिळालं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे पराभवाच्या भीतीपोटी आणि काँग्रेसमधील कारभारावर नाराज असलेले पक्षातील काही नेते शिवसेना-भाजपच्या संपर्कात आहेत.
यामध्ये पंढरपूरचे आमदार भारत भालके, माणचे आमदार जयकुमार गोरे, अक्कलकोटचे सिद्धराम मेहत्रे, मुंबईतील वडाळा येथील कालिदास कोळंबकर हे काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. तर अब्दुल सत्तार आणि नितेश राणे यांचाही या यादीत समावेश आहे. जसजशी निवडणूक जवळ येईल ही यादी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपा-शिवसेना युतीत आपला मतदारसंघ कुठल्या पक्षाच्या वाट्याला आहे, त्या पक्षात जाण्याकडे काँग्रेसच्या आमदारांचा कल असणार आहे. तसेच अशोक चव्हाणांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षाचा निर्णय झाला नसल्याने काँग्रेसचे नेते संभ्रमात आहेत, ज्याचा फायदा भाजपला होताना दिसत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक जण संपर्कात : विखे
काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक जण माझ्या संपर्कात आहेत. त्यातील काही जण युतीत प्रवेशासाठी इच्छुक आहेत, मात्र पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील, असा गौप्यस्फोट गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर अनेक जण नाराज आहेत. त्यामुळे मी स्वतः भाजपमध्ये आलो. आणखी जर कोणी युतीत प्रवेश केला तर त्यात आश्चर्य नाही, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.