मुंबई : राज्य शासनाने सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाला (एसईबीसी) दिलेल्या 13 टक्के आरक्षणानुसार नोकरीमध्ये नियुक्त्या देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गट ब मधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गातील रिक्तपदांवर मराठा समाजातील 34 जणांच्या एसईबीसी प्रवर्गातील 13 टक्के कोट्यातून नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण अंमलबजावणी संदर्भातील मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग हे एसईबीसी आरक्षणाची राज्यात प्रथम अमंलबजावणी करणारा विभाग ठरला आहे.

मराठा समाज आरक्षण कायदा नोव्हेंबर 2017 मध्ये लागू झाल्यानंतर शासनाने हा महाभरतीचा निर्णय घेतला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांच्या जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. न्यायालयाने नोकऱ्यांमध्ये एसईबीसी प्रवर्गातून 13 टक्के आरक्षण देण्याचा निकाल दिला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 31 डिसेंबर 2019 पर्यंत रिक्त होणाऱ्या 405 संभाव्य पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर 300 पदांचे आदेश काढण्यात आले असून यामध्ये एसईबीसी प्रवर्गातील 34 उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

व्हिडीओ पाहा



राज्यात मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास आरक्षण लागू झाल्यानंतर सुरु केलेल्या भरती प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. इतर पदांसाठीच्या भरती प्रक्रियेमध्येही मराठा समाजासाठीच्या एसईबीसी प्रवर्गातील इतर रिक्त पदेदेखील तातडीने भरण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.