मुंबई : सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं बुधवारी गँगस्टर अश्विन नाईकसह सात जणांची साल 2015 च्या एका खंडणी संदर्भातील आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. प्रमोद केळुसकर, राजेश तांबे, प्रथमेश परब उर्फ सोन्या, जनार्दन सकपाळ उर्फ जन्या, अविनाश खेडेकर उर्फ अव्या, मिलिंद परब उर्फ काण्या, सुरजकुमार गोवर्धन पाल उर्फ सनी अशी या सात जणांची नावं आहेत. या सर्वांविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. या सर्वांविरोधात मोक्कासह अपहरण, खंडणी आणि बेकायदेशीर हत्यारं बाळगल्याचे आरोप करण्यात आले होते.


काय होतं प्रकरण?
9 डिसेंबर 2015 रोजी अश्विन नाईकच्या सांगण्यावरून त्याच्या गुंडांनी एका विकासकाला बंदुकीचा धाक दाखवत उचलून नेलं होतं. त्यानंतर त्याला थेट अश्विन नाईकच्या एन.एम. जोशी रोडवरील ऑफिसमध्ये नेलं. तिथं त्या विकासकाला धमकावत 50 लाख रूपये आणि 6 हजार चौ.फूटांची जागा देण्याची धमकी देण्यात आली. त्यावेळी विकासकानं भीतीपोटी ही गोष्ट मान्य केली. मात्र सुटका होताच दादर पोलीस स्टेशनमध्ये खंडणीची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणी गोळा करण्यासाठी आलेल्या अश्विन नाईकला रंगेहात अटक केली होती. 


मात्र अश्विन नाईकसह सर्व आरोपींनी हे आरोप फेटाळून लावले. तसेच ही रक्कम केवळ आर्थित व्यवहाराचा भाग असल्याचं सांगत त्याचा खंडणीशी काहीही संबंध नसल्याचं कोर्टाला पटवून दिलं. सरकारी पक्षही आरोपींवर लावलेले गंभीर आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करू शकला नाही. त्यामुळे कोर्टानं सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.


महत्वाच्या बातम्या :