मुंबई : यंदा लालबागपासून अनेक मोठ्या गणेश मंडळांना भारताच्या चांद्रयान मोहिमेची भुरळ पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या महत्त्वकांक्षी चांद्रयान मोहिमेचा देखावा अनेक सार्वजनिक मंडळं साकारत आहेत. त्याचबरोबर घराघरांतही या चांद्रयानाचं आकर्षण असल्याचे पाहायला मिळत आहे. सांताक्रुझमधील मखवाना कुटुंबाच्या घरी यंदा गणरायाबरोबरच चंद्र आणि चांद्रयानही अवतरलं आहे. चांद्रयान 2 ची संपूर्ण प्रतिकृती मखवाना कुटुंबाच्या घरी पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या कुटुंबाने चांद्रयानाची आरास तयार केलेली नाही तर त्यांच्या घरी प्रत्यक्ष चांद्रयान कसं लॉन्च झालं, याचं प्रात्यक्षिकही पहायला मिळत आहे.

6 सप्टेंबर रोजी भारताने अवकाशात सोडलेल्या चांद्रयानाचा महत्त्वाचा टप्पा आहे. चांद्रयान 6 सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही चांद्रयानाची मोहिम यशस्वी होवो, हीच इच्छा गणपती बाप्पाच्या चरणी व्यक्त केली जात आहे.

दरवर्षी गणेशोत्सवात भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे वैशिष्ट्यपूर्ण देखावे साकारणं ही मखावाना कुटुंबियांची खासियत आहे. यापूर्वी त्यांनी चिनाब नदीवरचा जगातला सर्वात उंच पूल, सरदार वल्लभभाई पटेलांचा उंच पुतळा यांचे देखावे उभारले होते. भारताचे अभिमानबिंदू असणारे असे प्रकल्प गणेश देखाव्यात मखवाना कुटुंबीय साकार करतात आणि त्याबाबत भक्तांना माहितीही देतात. गेली 28 वर्षे आकर्षक देखावे ही मखवाना कुटुंबाची परंपरा आताची पिढीही पुढे नेत आहे.

चांद्रयानाचा हा देखावा साकारणाऱ्या दिपक मखवाना यांनी सांगितले की, "चांद्रयान मोहिम सुरु झाली तसं माझ्या डोक्यात या संकल्पनेनं आकार घ्यायला सुरुवात केली. आणि अवघ्या 15 दिवसात चांद्रयानाचा देखावा बनवून तयार झाला"

मखवाना यांनी सांगितले की,"मी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गोष्टी या चांद्रयानाच्या देखाव्यासाठी वापरल्या आहेत. लहान मुलांची खेळणी, वापरात नसलेल्या वस्तूंचाही या देखाव्यासाठी उपयोग केला आहे. इतकेच नाही तर यातलं 50% डेकोरेशन मी पुन्हा पुन्हा वापरतो"

'एबीपी माझा'ची 'बाप्पा माझा' स्पर्धा... स्पर्धेत कसा सहभाग घ्याल?