मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार अब्दुल सत्तार यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्तार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरु होती.


औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार असलेल्या अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. त्यामुळे सत्तार हे विधानसभेला सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून लढतील अशी काही दिवस जोरदार चर्चा होती. सत्तार यांनी गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री यांच्याकडे अनेक चकरा मारल्या. परंतु कोणताही निर्णय न झाल्याने सत्तार यांनी शिवसेनेची वाट धरल्याचं बोललं जात आहे.

शिवसेना पक्षप्रवेशाविषयी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, "गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांच्या पीकविमा, कर्जमाफी सबंधित प्रश्नांवर शिवसेना महाराष्ट्रात काम करत आहे. खरंतर मी काँग्रेसमध्ये असताना ती विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी होती पण ती जबाबदारी सत्तेत असतानाही शिवसेनेने पार पाडली". या गोष्टींमुळे शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे. तसेच येत्या काळात पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे देखील ते म्हणाले.