मुंबई : मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध गणेश गल्ली अर्थातच मुंबईच्या राजाचा (Mumbai Raja) प्रथम दर्शन सोहळा रविवार (17 सप्टेंबर) रोजी पार पडला. गणेश गल्लीच्या मंडळाचं यंदाचं हे 96 वं वर्ष आहे. तर यंदाच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा मुंबईच्या राजाच्या दरबारात साकारण्यात आला आहे. त्यामुळे बाप्पाच्या पाहुणचारासाठी आता संपूर्ण मुंबईनगरी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. गणपती आणि लालबाग हे समीकरण फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभरात माहित आहे.
'हे' आहे देखाव्याचं वैशिष्ट्य
यंदा मुंबईच्या राजाच्या दरबारात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकार करण्यात आला आहे. पुढील वर्षी 350 शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्ताने मुंबईचा राजाचा दरबार हा सजवण्यात आलाय. तर याचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे यासाठी थेट रायगडावरुन माती आणून तिचं पूजन करण्यात आलं आहे. मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी गणेश गल्ली अर्थातच मुंबईच्या राजाचा मान हा पहिला आहे. त्यामुळे हा गणपती देखील मुंबईकरांसाठी तितकाच विशेष आहे.
कडेकोट सुरक्षा बंदोबस्त
दरम्यान गणेश भक्तांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे मानाच्या या पहिल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी बरीच गर्दी केली होती. तर यावेळी मंडळाच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त, हॉस्पिटल इमर्जन्सी, सीसीटीव्ही कॅमेरे अशा सोयी सुविधा याठिकाणी उपलब्ध केल्या आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्याआधी मुंबईच्या राजाची पहिली झलक ही गणेश भक्तांना पाहायला मिळाली.
मुंबईतील गणेशोत्सव
मुंबापुरीसाठी गणेशोत्सव हा अत्यंत महत्त्वाचा सण असतो. मुंबईतर त्यांच्या लाडक्या बाप्पाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे या दहा दिवसांमध्ये मुंबईकरांचा उत्साह हा वाखाडण्याजोगा असतो. त्यातच मुंबईतील मानाच्या गणपतींची शान काही औरच असते. शुक्रवार (15 सप्टेंबर) रोजी लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शन सोहळा पार पडला. लालबागच्या राजाची पहिली झलक पाहण्यासाठी मुंबईकरांनी लालबाग परिसरामध्ये तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान तीच गर्दी आज मुंबईच्या राजाच्या ठिकाणी देखील पाहायला मिळाली.
यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्याचं दर्शन हे दोन्ही मंडळांकडून साकारण्यात आलं आहे. त्यामुळे बाप्पाच्या दर्शनासोबत शिवराज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव देखील भक्तांना घेता येईल. तर यासाठी मंडळांकडून विशेष तयारी देखील करण्यात आली आहे. मुंबईतील या परिसरामध्ये पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलाय. त्यामुळे मुंबईकरांचा गणेशोत्सव यंदाही धुमधडाक्यात होणार यात शंका नाही.