Ganesh Jayanti 2023 : यंदाचा माघी गणेशोत्सव (Maghi Ganesh Utsav) उद्या म्हणजेच 25 जानेवारी 2023 पासून साजरा होणार आहे. गणेश जयंतीच्या (Ganesh Jayanti) अनुषंगाने मुंबई महापालिकेने (BMC) माघी गणेशोत्सव साजरा करण्याबाबत सूचना जारी केल्या आहे. यानुसार मागील वर्षी गणेशोत्सव मंडळांना मिळालेल्या परवानग्या यंदा ग्राह्य धरल्या जाणार आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांच्या निर्देशांनुसार परिमंडळ 2 चे उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्याद्वारे पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत...
1. येत्या माघी गणेशोत्सवा दरम्यान असलेला अल्प कालावधी आणि त्यानंतर लगेचच साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारीमध्ये पोलिसांची असलेली व्यग्रता, यासर्व बाबी विचारात घेऊन माघी गणेशोत्सवासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांपैकी ज्या मंडळांना मागील वर्षी परवानगी देण्यात आली आहे, अशा मंडळांचे अर्ज स्थानिक/वाहतूक पोलिसांकडे न पाठवता, मागील वर्षीची परवानगी ग्राह्य धरुन विभाग कार्यालयांमार्फत छाननी करुन परवानगी देण्यात येणार आहे. नव्याने किंवा पहिल्यांदा अर्ज करणाऱ्या मंडळांच्या अर्जांच्या बाबतीत मात्र स्थानिक/वाहतूक पोलिसांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
2. विभागीय सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभागात माघी गणेशोत्सवादरम्यान उभारावयाच्या कृत्रिम तलावांबाबत आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर आवश्यकतेनुसार यथायोग्य सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात येईल.
3. माघी गणेशोत्सवादरम्यान मंडप उभारणीच्या परवानगीसाठी प्रतिवर्षीप्रमाणे असंगणकीय कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येईल.
4. कोविड-19 किंवा त्या अनुषंगिक विविध प्रकारांच्या प्रादुर्भावाचा किंवा पुनरुद्भवाचा संभाव्य धोका विचारात घेता, शासनाने उत्सव कालावधीत 'कोविड-19' या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जारी केल्यास, संबंधित परिस्थितीत त्यांचे पालन केले जाईल, अशा आशयाचे हमीपत्र मंडळांकडून स्वीकारणे आवश्यक असेल.
5. महानगरपालिका आयुक्तांनी माघी गणेशोत्सवादरम्यान उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे शुल्क पूर्णपणे माफ करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. यासाठी, फक्त याच वर्षापुरते माघी गणेशोत्सवादरम्यान उभारण्यात येणाऱ्या मंडपांसाठी शुल्क पूर्णपणे माफ करण्यास मंजुरी दिली आहे. तथापि, विभाग कार्यालयामार्फत परिपत्रक निर्गमित होण्यापूर्वीच माघी गणेशोत्सवाच्या मंडपासाठी सशुल्क परवानगी दिली असल्यास शुल्क परताव्याची कार्यवाही करण्याचे निर्देश 23 जानेवारी 2023 रोजीच्या परिपत्रकांन्वये देण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील माघी श्री गणेशोत्सवादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस दल यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन देखील मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.