मुंबई: गणेश चतुर्थीनिमित्त आज गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. सर्वांनाच बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेचे वेध लागले आहेत. घरोघरी आज बाप्पा विराजमान होतील. तर सार्वजनिक मंडळातही विघ्नहर्ताची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल.


तिकडे मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली आहे. पहाटे 5 वाजता सिद्धिविनायकाची काकडआरती करण्यात आली. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तांची रीघ लागली.

तिकडे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीही भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी केली आहे. लालबागच्या राजाच्या चरणी सामान्य भाविकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांची गर्दी असते. यंदा लालबागच्या राजानं मोरांच्या पिसांची प्रभावळ धारण केली आहे. स्टेजवर पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा देखावाही उभारण्यात आला आहे. विद्युत रोषणाई आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात भाविकांनी सकाळपासूनच लालबागच्या राजाच्या दरबारात गर्दी केली आहे.

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरीदेखील गणरायाचं आगमन झालं. अंबांनीचे पुत्र अनंत अंबानी यांनी स्वत: चित्रशाळेत पूजा केली आणि सजवलेल्या ट्रकमधून बाप्पाला घरी आणलं. लालबागच्या राजासारखीच दिसणारी 5 फुटांची ही मूर्ती आहे. गेल्या 4 वर्षांपासून सागर पांचाल ही मूर्ती खास अंबानी कुटुंबीयांसाठी साकारतात. चिंचपोकळीच्या अतुल सागर आर्ट चित्रशाळेत ही मूर्ती तयार करण्यात आली आहे.

ट्विटरवर शुभेच्छांचा वर्षाव

गणेश चतुर्थीनिमित्त सोशल साईट्सवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ट्विटर इंडियाने यंदा मात्र खास हॅश टॅग केलेले नाहीत. सध्या ट्विटरवर #GaneshChaturthi  #GanpatiBappaMorya  हे हॅश टॅग ऑल इंडिया ट्रेंण्डिंग आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


राजनाथ यांचं मराठी ट्विट

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मराठी ट्विट करुन देशवासियांना शुभेच्छा दिल्या. "सुखकर्ता...दु:खहर्ता.. विघ्न विनाशक असणाऱ्या गणरायाचे आज देशभर आगमन झाले आहे. या मंगल समयी देशातील तमाम जनतेला उत्तम आरोग्य, यश आणि समृध्दी लाभो ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो! गणपती बाप्पा मोरया!" अशा शुभेच्छा राजनाथ सिंह यांनी दिल्या.


वीरेंद्र शुभेच्छा हटके शुभेच्छा

टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने त्याच्या स्टाईलमध्ये गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. सेहवागने ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. एक गणपती क्रिकेट खेळताना दिसत आहे.

"विघ्नविनायक तुमची सर्व विघ्न दूर करो आणि तुमच्यावर प्रेम आणि आनंदाचा वर्षाव होवो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया", असं ट्विट सेहवागन केलं आहे.


संबंधित बातम्या 

बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी, राज्यभरातल्या बाजारपेठा फुलल्या 

लालबागच्या राजाने राजमहल सोडला, प्रथमच जंगलातील शिळेवर विराजमान! 

ढोल-ताशांच्या गजरात गणेश गल्लीच्या राजाचं मुखदर्शन