मुंबई : यंदाच्या जी-20 परिषदेचं (G-20 Summit) यजमानपद हे भारताने (India) भूषवलं. त्यासाठी अनेक देशांचे प्रमुख नेते हे भारतात आले होते. या परिषदेसाठी नवी दिल्ली (New Delhi) येथील प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या जी-20 परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांचा शाही पाहुणाचार करण्यात आला. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च देखील झाला. या खर्चावरुन सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. विरोधकांकडून याच मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला जातोय. सोशल मीडियावर देखील सामान्य नागरिकांनी अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांची अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
त्यांनी त्यांच्या या पोस्टच्या माध्यमातून भारताने जी-20 साठी केलेल्या खर्चाची उजळणी केलीये. तर सरकारला काही खडेबोल देखील सुनावले आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत आपली मतं देखील व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून सरकारला अनेक प्रश्न देखील विचारले आहे. नेमकं काय म्हणालेत ते त्यांच्या पोस्टमध्ये जाणून घेऊयात.
हेरंब कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट
दिल्लीत जी-20 परिषद सुरू आहे. भारतासाठी हे नक्कीच कौतुकास्पद आहे. सर्व नेते आपल्या पंतप्रधानांशी व्यक्तिगत बोलताना देश म्हणून नक्कीच अभिमान वाटतो. पण हा गौरव वाटताना या परिषदेच्या खर्चाचे आकडे बघितले तेव्हा खूप अस्वस्थता आली. या परिषदेवर आपण 4255 कोटी रुपये फक्त सुशोभन करण्यासाठी खर्च करत आहोत. आतमधील परिषद खर्च, जेवण हा खर्च वेगळाच आहे. आत जेवणासाठी 500 पदार्थ आहेत. जेवणासाठी चांदीची,सोन्याचा वर्ख असलेली ताटे खास कुशल कारागिर बोलावून बनवली आहेत. हे 500 पदार्थ बनविण्यासाठी 2500 लोकं काम करत आहेत. राजधानीत सर्वत्र सजावट करून कारंजी बसवली आहेत.
भारतासारख्या गरीब असलेल्या देशात हे घडते आहे हे जास्त वेदनादायक आहे.एकूण बजेट च्या ही रक्कम अतिशय छोटी आहे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रप्रमुख आल्याने हे करायला हवे, असे युक्तिवाद केले जातील पण इतर देशांनी त्यांच्याकडे परिषद घेतली तेव्हा इतका खर्च केला नव्हता हे लक्षात घ्यायला हवे.
अर्जेंटिनाने 11 कोटी डॉलर्स खर्च केला होता.
जपान ने 32 कोटी डॉलर्स खर्च केला होता
इंडोेशियाने 3.3 कोटी डॉलर्स खर्च केला होता
जर्मनीने 9.4 कोटी डॉलर्स खर्च केला होता
आणि भारत 50 कोटी डॉलर्स खर्च करत आहे. याचे समर्थन कसे करायचे ?
जर्मनी आपल्यापेक्षा श्रीमंत देश अल्प खर्च करताना आपण असे का वागतो आहोत ? जर्मनीच्या सहा पट खर्च होतोय आणि विशेष म्हणजे जर्मनीचे दरडोई उत्पन्न 59000 आहे तर भारताचे आहे फक्त 7000.
इतक्या गरीब देशाने असे का वागावे ? इतका खर्च करणाऱ्या देशावर कर्ज 155 लाख कोटी आहे आणि त्यावर आपण 9.28 लाख व्याज भरत आहोत. कर्जबाजारी देश सेंट्रल व्हिस्ता बांधतो आहे आणि अशा परिषदावर इतका खर्च करतो आहे. पुन्हा दिल्लीत गरीबी दिसू नयेत म्हणून काही ठिकाणी मोठे पडदे लावले आहेत तर काही ठिकाणी बुलडोझरने झोपड्या पाडल्या आहेत.
अशावेळी हमखास एशियाडपासून राष्ट्रकुलमध्ये झालेला काँगेस काळातला खर्च भक्त सांगतील पण तुलना केली तरी हा अतिरेक आहे .नुसत्या नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात 100 कोटी या सरकारने उधळले होते यावरून कल्पना यावी. केवळ हे सरकारच नव्हे तर सर्व पक्ष सरकारे अशीच वागत आहेत. सर्व पक्षांच्या बैठका या पंचतारांकित हॉटेलात होतात. इंडियाची मुंबईत झालेली बैठक अशीच खूप खर्चिक होती. मुख्यमंत्री राज्यपाल ज्या कार्यक्रमात जातात तिथेही हेच अनुकरण होत असते. राज्यपाल भवनात तर मनोरंजन कार्यक्रमात खूप उधळपट्टी होते. इव्हेंट मॅनेजमेंट नावाचे ठेकेदार निर्माण झाल्यापासून प्रत्येक कार्यक्रमावर अशीच उधळपट्टी सुरू असते....हे करताना आपण गरीब माणसांचे प्रतिनिधी आहोत याची जाणीव नसते.
मुळात या सर्व नेत्यांना आपण कोणाचे प्रतिनिधी आहोत याचेच भान उरले नाही. एका भुकेकंगाल देशातील गरीब माणसांचा देश आहे. त्यातील गरीब माणसांची घरे कशी आहेत. त्यांची पाडे, पाले कशी आहेत, रस्त्यावर राहणारे लोक कसे राहतात ? आणि त्याच देशात आपण फक्त 2700 कोटींचा मंडप दोन दिवसांसाठी उभारत आहोत...? याची काहीच टोचणी लागत नसेल ? दिल्ली आणि उरलेला भारत याचे काहीच कनेक्शन नाही का ?
प्रश्न या रकमेचा नाही तर मानसिकतेचा आहे.आपण कोणाचे प्रतिनिधी आहोत हे विसरण्याचा आहे आणि विसंगती म्हणजे इतकी उधळपट्टी करून या सर्व नेत्यांना राजघाटावर नेले जाणार आहे.गांधींना सरकार वंदन करणार आहे आणि आपले सरकार गांधीच्या विचारांवर कशी वाटचाल करते आहे हे सांगणार आहे. पण याच गांधीनी साधेपणा या देशातील दारिद्र्याशी जोडला. देशातील लोकांना घालायला कपडे नाहीत म्हणून पंचा घातला. बनारस येथे ऐकायला आलेले श्रीमंत श्रोते सोन्याचे दागिने घालून आले तर गांधीनी यांच्या त्या प्रसिद्ध भाषणात तुम्ही या गरीब देशातील भुकेकंगाल माणसांच्या देशात राहत आहात याचे भान ठेवा अशी त्या श्रीमंतांची कानउघाडणी केली होती आणि त्याच देशात ही उधळपट्टी सुरू आहे. ते भान पूर्णपणे विसरले आहे . रकमेपेक्षा आपण कोणाचे प्रतिनिधी आहोत ? आपण कोणत्या देशात हे करतो आहोत ? याचे भान नसणे हे जास्त व्यथित करणारे आहे .
हेरंब कुलकर्णी यांच्या या पोस्टमुळे सरकारने या परिषदेसाठी केलेल्या खर्चाचा पाढाच वाचण्यात आला आहे. दरम्यान केंद्र सरकारने आणि इतर राजकीय पक्षांनी केलेल्या खर्चाची उजळणी देखील त्यांनी केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :
G20 Summit : भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरची घोषणा, पंतप्रधान मोदींकडून आनंद व्यक्त