Sanjay Raut: राजधानी दिल्लीत G-20 परिषद (G-20 Summit 2023) सुरू आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली प्रथमच या परिषदेचं आयोजन होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden), ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासह अनेक देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी दिल्लीत सर्वांची एकत्र डिनर डिप्लोमसी देखील झाली. मात्र काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्यावरून आता विरोधकांकडून टीका होत आहे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील यावरुन खडेबोल सुनावले आहेत. 


संजय राऊतांकडून सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची बरसात


संजय राऊतांनी अनेक प्रश्न विचारुन सत्ताधाऱ्यांना चांगलंत घेरलं आहे. G-20 परिषदेसाठी सर्व राष्ट्रांचे प्रमुख दिल्लीत आले आहेत. परंतु ज्यांनी आपली जमीन दिली आहे, ती परत मिळणार आहे का? भारतावरील कर्ज माफ होणार आहे का? या परिषदेसाठी किती खर्च झाला आहे? असे अनेक प्रश्न राऊतांनी उपस्थित केले.


"नेहरु, सोनिया गांधींनीही आयोजित केल्या अशा प्रकारच्या बैठका"


आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा बैठका महत्त्वाच्या असतात आणि मोदींनी ते केलेलं आहे, पण देशात हे पहिल्यांदाच घडत नसल्याचं राऊत म्हणाले. तर इंदिरा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान असताना देखील अशा प्रकारच्या बैठका झालेल्या आहेत, असं संजय राऊत म्हणाले. तर ही G20 परिषद आहे की, मोदी 20-20? असा प्रश्न सर्वांना पडतोय, असं  देखील संजय राऊत म्हणाले.


"लडाखमध्ये गेलेली अर्धी जमीन परत मिळणार का?"


आज आपल्या भागावर चीनचं अतिक्रमण झालेलं आहे. परंतु चीनचे राष्ट्राध्यक्ष मिस्टर पुतिन इथं आलेले नाहीत, हे लक्षात घ्या. शेवटी या परिषदेतून काय मिळणार आहे? याकडे आमचंही लक्ष आहे. लडाखमध्ये गेलेली अर्धी जमीन परत मिळणार असेल, तर आम्ही बैठकीचं स्वागत करू, असं संजय राऊत म्हणाले. या बैठकीमुळे जर भारताची ताकद वाढली असेल तर त्याचं नक्की स्वागत करू, असंही संजय राऊत म्हणाले.


विरोधी पक्ष नेत्याचा द्वेष करणं चुकीचं : संजय राऊत


G20 मध्ये लोकशाहीची फार मोठी तुतारी वाजवण्यात येते. परंतु जे जेवणावेळीचे कार्यक्रम झाले, त्यात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना बोलवलं नाही, असं संजय राऊत म्हणाले. जी पुस्तिका दिली त्यात भारत कसा लोकशाहीचा जनक आहे, जननी आहे, असं सांगितलं गेलं. परंतु त्यात संसदेतील विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना स्थान नसेल तर ती जननी ही वांझ केली जात आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. राज्यकर्त्याचं मन मोठं असावं लागतं. तुम्ही तुमच्या विरोधी पक्ष नेत्याचा द्वेष करत आहात. हे चुकीचं आहे, असंही त्यांनी म्हटलं.


हिंमत असेल तर कायद्याचं पालन करा : संजय राऊत


शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. इतके दिवस सुनावणी लांबवण्याची गरज नाही, असं राऊत म्हणाले. कालच मी व्हिडीओ पाहिला दहीहंडीच्या एका मंचावर विधानसभा अध्यक्ष कॉलर उडवून नाचत होते. ही चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही सुनावणी करा. आम्ही सुद्धा तुमच्या सन्मानासाठी नाचू. हिंमत असेल तर कायद्याचं पालन करा. तुम्हाला नाचायला वेळ आहे. परंतू आमदारांच्या फैसल्या संदर्भात तुम्हाला वेळ नाही, असा घणाघाती टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


राजस्थानात काँग्रेसचं टेन्शन वाढलं; अशोक गेहलोतांना टक्कर देणारे राजेंद्रसिंह गुढा शिंदेंच्या गळाला