मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयानंतर एटीएम आणि बँकांबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र ब्रँड फॅक्टरी शोरुमच्या बाहेरही वीकेंडला त्याहून लांब रांग लागली होती. फ्युचर ग्रुपतर्फे 'ब्रँड फॅक्टरी'च्या आऊटलेट्समध्ये कपड्यांच्या खरेदीवर मोठा डिस्काऊंट जाहीर करण्यात आल्याने ग्राहकांच्या उड्या पडत होत्या.


शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांसाठी हा सेल सुरु होता. पाच हजार रुपयांच्या वस्तू केवळ दोन हजार रुपयांत उपलब्ध होत्या. सोबत एक हजार रुपयांचा शर्ट मोफत जिंकण्याची संधी आणि एक हजार रुपयांचं व्हाऊचरही फ्री मिळणार होतं.

अनेक ग्राहकांनी दोन हजार रुपयांची नोट आणली होती. दोन हजार रुपयांत पाच हजार रुपयांच्या कपड्याची खरेदी करु देणं, हा आमचा उद्देश असल्याचं 'फ्युचर ग्रुप'चे संस्थापक आणि सीईओ किशोर बियाणी यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षांतली ही सर्वात मोठी ऑफर असल्याचा दावाही त्यांनी केला. तीन दिवसांत शंभर कोटींची विक्री करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही बियाणींनी स्पष्ट केलं.