(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत रक्त मिळणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा
राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून लोकांना रक्तदान करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.सोबतचं यापुढे शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा राजेश टोपे यांनी केली आहे.
मुंबई : राज्यात रक्त टंचाईच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज रक्तदान केले. त्यावेळी त्यांनी शासकीय रुग्णालयात शनिवारपासून मोफत रक्त दिले जाणार असल्याची घोषणा केली. यापूर्वी शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी 800 रुपये शुल्क आकारले जाते होते.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताची टंचाई भेडसावत असून त्यामुळे विविध ठिकाणी रक्तदानाच्या शिबिरांचे आयोजन करण्यासाठी शासनातर्फे आवाहन केले गेले आहे. त्या अनुषंगाने आज दुपारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी टोपे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि रक्तदात्यांनी रक्तदान केले.
लोकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे : राजेश टोपे
एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी रक्त हा घटक किती महत्वाचा आहे, याची सर्वांना जाणीव आहे. राज्यात सुमारे 344 ब्लड बँक कार्यरत आहेत. त्यामध्ये काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. खासगी कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या मर्यादेमुळे रक्तदान शिबीरे आयोजित करण्यावर मर्यादा येत आहेत. या साऱ्यांमुळे रक्तदान कमी होत आहे. एरवी महाराष्ट्र देशात रक्त संकलानात अग्रेसर आहे. मात्र, आता कोरोनामुळे रक्तटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रक्तदान करणे हाच एक पर्याय असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची तयारी! काय असणार प्राधान्यक्रम?
टोपे पुढे असेही म्हणाले की, शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी 800 रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्याला मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच रक्त तयार करता येत नाही आणि संकलन केलेले रक्त दीर्घकाळ साठवता येत नाही. त्यामुळे सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 13 ते 20 डिसेंबर दरम्यान स्वाभिमान सप्ताह साजरा केला जाणार असून त्यानिमित्त प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या वाढदिवशी, लग्नाच्या वाढदिवशी अशा विविध प्रसंगाचे औचित्य साधून वर्षातून दोन वेळेस रक्तदान करण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.