मुंबई : घाटकोपरमधील साईदर्शन इमारत दुर्घटनेचा आरोपी सुनिल शितपचे आणखी कारनामे आता बाहेर आले आहेत. कोसळलेल्या साईदर्शन इमारतीच्या मूळ ढाच्यात शितपने विनापरवानगी फेरफार केल्याने इमारत कोसळली. मात्र, सुनिल शितपने केलेलं हे एकच आणि पहिलं बेकायदेशीीर काम नाही.
साईदर्शन कोसळली त्याच्या अवघ्या एक ते दीड किमीच्या परिघातच शितपच्या अनधिकृत कारनाम्यांचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात.
ज्या ठिकाणी घाटकोपरमधली साईदर्शन इमारत कोसळली, त्याच्या अवघ्या एक ते दीड किमीच्या परिसरातच सुनिल शितपनं चार अनधिकृत बांधकामं केली आहेत आणि आश्चर्य म्हणजे साईदर्शन कोसळेपर्यंत त्यांच्याकडे महापालिकेचं लक्षही नाही.
घाटकोपमधील सुनिल शितपची अनधिकृत बांधकामं
अल्ताफ नगर झोपडपट्टीला लागुन असेलेले दुमजली बांधकाम
जागा – 2100 स्के. फूट
कोसळलेल्या साईदर्शन इमारतीपासून अवघ्या 1 किमीच्या परिघात
अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर झोपडपट्टीला लागून असेलेले गॅरेज
जागा – 200 स्के. फूट
कोसळलेल्या साईदर्शन इमारतीपासून अवघ्या 1 किमीच्या परिघात
अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरच्या महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरचे वेअरहाऊससाठी असलेले बांधकाम
जागा – 2500 स्के. फूट
कोसळलेल्या साईदर्शन इमारतीपासून अवघ्या 700 मीटरच्या परिघात
अल्ताफ नगर येथील दोन कॅटरिंग व्यवसायाचे गाळे
जागा – 2000 स्के. फूट
कोसळलेल्या साईदर्शन इमारतीपासून अवघ्या 1 किमीच्या परिघात
या बांधकामांवर महापालिकेने साईदर्शन इमारत कोसळल्याच्या दोन दिवसांनंतर कारवाई केली.
साईदर्शन इमारत कोसळल्यानंतर महापालिका यंत्रणांवरचा दबाव वाढला आणि या शितपच्या चार पैकी एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. मात्र, अजूनही शाबुत असणाऱ्या इतर अनधिकृत बांधकामांचं काय, हा प्रश्न कायम आहे.
जे बांधकाम पालिकेनं तोडलं, त्याच्या शेजारीच दुमजली अनधिकृत बांधकाम आहे. या दुमजली बांधकामासंदर्भात कोर्टात केस सुरु आहे. तसेच याच दुमजली बांधकामाशेजारी एक गॅरेज आहे.
सुनिल शितपने आतापर्यंत घाटकोपरमध्येच वेगवेगळ्या पद्धतीनं जमिनी ताब्यात घेऊन त्यावर अनधिकृत बांधकामं केली आहेत. आश्चर्य म्हणजे महापालिकेनेच मनोरंजन मैदानांसाठी आरक्षित केलेलं मैदानच पालिका अधिकाऱ्यांच्या कृपाशिर्वादानं शितपनं गिळंकृत केलं.
घाटकोपरमध्ये शितपनं महापालिकेच्या जागा बळकावल्या आहेत. तर पवईसारख्या मोक्याच्या ठिकाणी म्हाडा आणि शिपिंग कॉर्पोरेशनच्या जागेवर सुनिल शितपनं थेट बार आणि रेस्टॉरंट बांधले आहे.
17 निष्पापांचे बळी घेतल्यानंतर आता सुनिल शितपभोवतीचे फास आवळले जातीलही. मात्र, केवळ एक ते दीड किमीच्या परिघात किंवा पवईतल्या उच्चभ्रु वस्तीच्या जवळ गेली अनेक वर्षे सुनिल शितप राजरोस अनधिकृत इमले बांधत होता, ते नेमक्या कुणाच्या आशिर्वादानं? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
सुनिल शितपची मोडस ऑपरेंडी :
मुंबई हे भूमाफियांसाठी कुरण आहे. कारण इथल्या जमिनीला एक तर सोन्याचा भाव आहे. त्यातच सगळी महत्वाची प्रशासकीय यंत्रणा त्यांची मुख्यालये मुंबईतच आहेत. या प्रशासकीय यंत्रणांमधला एक जरी मासा गळाला लावला, तर अशा भूमाफियांना चरायला मुंबईच्या जमिनींची कुरणे मोकळी होतात. मुंबईत मोक्याच्या जमिनी बळकावणारा सुनिल शितप हाही त्यांच्यापैकीच एक.
पवईतल्या मोक्याच्या ठिकाणी रुमर्स लाँज हे बार, रेस्टॉरंट उभारताना शितपने जी मोडस ऑपरेंडी वापरली, तिचाच वापर मुंबईतल्या इतर जागा बळकावतानाही झाला.
झोपडपट्टीशेजारची किंवा दोन प्रशासकीय यंत्रणांच्या सीमारेषेवरची एखादी दुर्लक्षित जागा हेरायची. त्यावर रातोरात बांधकाम उभारायचे. हे बांधकाम स्वतःच्या नावावर दाखवताना खोटे खरेदी खत सादर करायेच. बरेचदा अस्तित्वातच नसलेल्या व्यक्तीच्या मालकीची जमीन आपण खरेदी केलीय, हे दाखवायचे आणि याच खोट्या सातबाराच्या आधारे न्यायालयात केस उभी करायची.
मुंबई महापालिका आणि सुनिल शितप यांच्यात सध्या 6 केसेस कोर्टात सुरु आहेत. मात्र, या केसेस वर्षानुवर्षे पेंडिंग राहाव्यात म्हणून महापालिकाही शितपला अप्रत्यक्ष मदतच करत आली.
घाटकोपरमध्येच सुनिल शितपची आणखी 4 अनधिकृत बांधकामं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jul 2017 10:28 AM (IST)
घाटकोपर इमारत दुर्घटनेत 17 जणांचा बळी घेणाऱ्या सुनिल शितपचे वेगवेगळे कारनामे आता बाहेर येत आहेत. कोसळलेल्या साईदर्शन इमारतीच्या मुळ ढाच्यात शितपने विनापरवानगी फेरफार केल्याने इमारत कोसळली. मात्र, सुनिल शितपने केलेलं हे एकच आणि पहिलं बेकायदेशिर काम नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -