मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांचे 153 निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. तसंच उर्वरित विविध शाखांचे 55 निकाल लवकरच जाहीर केले जातील असं विद्यापीठानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे. 17 लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांपैकी जवळपास 90 टक्के उत्तरपत्रिकांचं मुल्यांकन झाल्याचंही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलं.


मुंबई विद्यापीठानं जाहीर केलेल्या निकालांमध्ये कलाशाखेचे 78, तंत्रज्ञान विभागाचे 48, विज्ञान शाखेचे 10, व्यवस्थापन शाखेचे 10, वाणिज्य शाखेचे 7, असे एकुण 153 निकाल जाहीर करण्यात आले आहेत. वाणिज्य व विधी शाखेचे निकाल वगळता बहुतांश शाखेतील 90 ते 98 टक्के मुल्यांकन झाल्याचं विद्यापीठानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. उर्वरित 55 निकाल तयार असून ते लवकरच जाहीर केले जाणार आहेत, असंही विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे.

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुढाकार घेतल्यानं मुंबई विद्यापीठानं मुल्यांकनाच्या कामासाठी नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापूर विद्यापीठांची मदत घेतल्याचंही विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे. एकुण 17 लाख 36 हजार 145 उत्तरपत्रिकांपैकी 90 टक्के उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन झालं आहे, तर 3 लाख 25 हजार 305 उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन लवकरच विद्यापीठातर्फे केले जाणार आहे.