ठाणे : ठाणे कारागृहातही COVID-19 ने शिरकाव केला आहे. काल (21 जून) मिळालेल्या माहितीनुसार चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजते आहे. याआधी एका महिन्यापूर्वी एका कर्मचाऱ्याला कोविड-19 ची लागण झाली होती. त्यानंतर काल चार जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. यासोबतच ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एक कर्मचारी आणि त्याच्या पत्नीचाही कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.


ठाणे मध्यवर्ती कारागृह अतिशय मोठे आणि महत्त्वाचे कारागृह आहे. या कारागृहात एका महिन्यापूर्वी एका कर्मचाऱ्याला कोविड-19 ची बाधा झाली होती. त्यानंतर मात्र परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र रविवारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. चार कर्मचाऱ्यांना कोविड-19 ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कारागृहात खळबळ माजली आहे. या कर्मचाऱ्यांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथे तपासण केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव आल्याने आता त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 12 जणांचे अलगीकरण केल्या कळते. त्यामुळे ठाणे कारागृहात कोविड-19 चा धोका वाढला आहे. एकूण सात जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी चार जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्यावर आता उपचारही सुरु करण्यात आले आहेत. याबाबत कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांना फोन आणि मेसेज केले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.


दुसरीकडे ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात देखील कोविड-19 चा शिरकाव झाल्याचे उघड झाले आहे. आरटीओमध्ये काम करणाऱ्या एका कनिष्ठ लिपिकाचा शनिवारी (20 जून) मृत्यू झाला तो कोविड-19 बाधित होता. धक्कादायक म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या पत्नीचा देखील कोविड-19 मुळेच मृत्यू झाला. त्यामुळे हा कर्मचारी कामावर आलेल्या दिवसात त्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचारी अधिकारी आणि नागरिकांचा शोध घेतला जात आहे. काही जणांची कोविड-19 चाचणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.