मुंबई : माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान यांचे शुक्रवारी वयाच्या 92व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. 36 वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत अनेक केंद्रीय आणि राज्यातील नेत्यांशी अत्यंत चांगले संबंध जुळले होते. यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते. पंजाबमधील ऑपरेशन ब्ल्यूस्टारनंतर पंजाबमध्ये शांती निर्माण करण्यापासून ते मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याचा अहवाल सादर करण्यापर्यंत त्यांनी विविध भूमिका बजावल्या होत्या. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय इतिहासातील एक चालता-बोलता अध्याय संपला आहे.
राम प्रधान जीनिव्हात असताना त्यांना बाबासाहेब भोसले यांनी फोन करून महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तेव्हा आपण कधी भेटलेलो नाही वा आपले कधी नावही ऐकलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलत आहे यावर विश्वास कसा ठेवणार असा प्रतिप्रश्न विचारणारे अधिकारी म्हणजे राम प्रधान. १९५२ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी राम प्रधान यांनी संरक्षण मंत्रालय, व्यापार मंत्रालय, राज्याचे गृहसचिव, जहाजबांधणी विभागाचे महासंचालक, जिनिव्हात संयुक्त राष्ट्रसंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, केंद्रीय गृहसचिव ते अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद अशी विविध पदे भूषवली आहेत.
राम प्रधान यांच्या सेवेचा बराचसा काळ हा केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर किंवा परदेशात गेला. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये गृह सचिव असताना त्यांना सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू असल्याचा सुगावा लागला. ही बाब त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या कानावर घातली परंतु त्यांचा शरद पवार यांच्यावर विश्वास असल्याने त्यांनी लक्ष दिले नाही आणि एक आठवड्याभरातच दादांचे सरकार गेले.
राजीव गांधी पंतप्रधान असताना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता मुंबईत आले होते. विमानतळावरच त्यांनी राम प्रधान यांना दिल्लीत काम करण्यास सांगितले. राम प्रधान यांनी गृहसचिवपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा पंजाब, आसाम आणि मिझोराम या तीन राज्यांमध्ये हिंसाचार सुरू होता. पंजाब-प्रश्नावर तोडगा काढण्याची जबाबदारी राजीव गांधी यांनी त्यांच्यावर सोपवली होती. तेव्हा त्यांनी राज्यपाल बदलण्याची आणि तेथे राजकीय व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची सूचना केली. अर्जुनसिंग यांची राज्यपालपदी निवड झाली. पुढे पंजाबमध्ये शांततेसाठी करारही झाला. आसामचा तिढा सोडविण्यातही त्यांनी यश मिळवले होते. 30 जून 1986 हा निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी भारत सरकार आणि मिझो बंडखोरांमध्ये शांतता करार घडवून आणला होता.
सरकारी सेवेत काम करताना आलेले अनुभव, राजकारण्यांशी संबंध यावर आधारित त्यांनी बियॉन्ड एक्सपेक्टेशन हे आत्मचरित्रही लिहिले होते.
माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान यांचं वृद्धापकाळाने निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Aug 2020 07:56 AM (IST)
राम प्रधान यांच्या सेवेचा बराचसा काळ हा केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर किंवा परदेशात गेला. त्यांनी सरकारी सेवेत काम करताना आलेले अनुभव राजकारण्यांशी संबंध यावर आधारित त्यांनी बियॉन्ड एक्सपेक्टेशन हे आत्मचरित्रही लिहिले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -