मुंबई :  मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police) वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी  आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होत आहेत. प्रदीप शर्मा यांच्या दुसऱ्या कार्यालयाचे अंधेरी पूर्वेकडील (Andheri East) मरोळ मरोशी रोड (Marol Maroshi Road) परिसरात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मरोळकरांनी प्रदीप शर्मा यांचे ढोल ताशाच्या गजरात जोरदार स्वागत केले. यापूर्वीच प्रदीप शर्मा यांनी एमआयडीसी परिसरात संपर्क कार्यालय उघडले होते. त्यामुळे आगामी काळात प्रदीप शर्मा हे विधानसभा निवडणुकीत उतरणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.


प्रदीप शर्मा यांची पोलीस दलातील कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी केलेले काही एन्काऊंटर वादग्रस्त राहिले असून त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. 


अंधेरी पूर्वमधून निवडणुकीच्या रिंगणात?


प्रदीप शर्मा हे आगामी 2024 विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे प्रदीप शर्मा हे अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून शिंदे गटाकडून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची देखील परिसरात चर्चा सुरू आहे. यापूर्वी प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये शिवसेना पक्षाकडून नालासोपारा विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. 


प्रदीप शर्मा काय म्हणाले?


प्रदीप शर्मा यांनी म्हटले की, मागील आठ वर्षापासून समाजकारणात आहे. अंधेरीकरांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. नागरिकांनी त्या समस्या लेखी स्वरूपात या कार्यालयात द्याव्यात असे त्यांनी म्हटले. अंधेरी पूर्वेकडील प्रत्येक वार्डात कार्यालय उभारणार असून प्रत्येक वार्डातील कार्यालयात आठवड्यातून एकदा भेट देणार असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. 


प्रदीप शर्मा यांनी राजकारणातील प्रवेशावर थेट भाष्य करणे टाळले. सध्या मी समाजकारण करत असून राजकारण करत नसल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीबाबत वेळ आल्यावर पाहुयात असेही शर्मा यांनी म्हटले. 


मनसुख हिरेन प्रकरणात मिळाला आहे जामीन 


 व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरण (Mansukh Hiren Murder Case) आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणी (Antilia Bomb Case) अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयानं  23 ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला होता. 


प्रदीप शर्मा यांना जून 2021 मध्ये झालेली अटक


अँटिलिया प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) मनसुख हिरेनच्या हत्या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक केली होती. आपला माजी सहकारी सचिन वाझे याला मदत केल्याचा आरोप प्रदीप शर्मांवर करण्यात आला आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली SUV सापडली होती. ही एसयूव्ही ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांची होती. त्यानंतर काहीच दिवसांत मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च 2021 रोजी ठाण्यातील खाडीतून सापडला होता. याप्रकरणी प्रदीप शर्माला जून 2021 मध्ये अटक करण्यात आली होती.