Mumbai Local Megablock News: मुंबई : आज रविवार (Sunday, 5th November) आठवड्याच्या सुट्टीचा दिवस. अशातच दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. जर दिवाळी (Diwali 2023) शॉपिंगसाठी घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल, तर मग आधी ही बातमी वाचा. घरातून निघण्यापूर्वीच प्रवासाचं नियोजन करा आणि मगच घराबाहेर पडा. नाहीतर तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागू शकतो. याचं कारण म्हणजे, आज मुंबई लोकलच्या (Mumbai Local) तिनही मार्गांवर मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) सहाव्या मार्गिकेच्या कामांमुळे आधीपासूनच मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. तसेच, आज मध्य (Central Railway) आणि हार्बर मार्गांवरही (Harbor Railway) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 


रेल्वे मार्गिकेचं काम सुरू असल्यानं तिनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते भायखळा रात्रकालीन आणि कुर्ला ते वाशीदरम्यान आज मध्यरात्री दिवसा रेल्वेनं ब्लॉक घोषित केला. लोकलच्या फेऱ्या रद्द झाल्यानं प्रवाशांचे मोठ्याप्रमाणात हाल झालेत. तसंच आज या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेच्या कामांमुळे 110 लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पश्चिम रेल्वेवर खार- गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी सुरु असलेल्या ब्लॉकचा रविवार शेवटचा दिवस आहे. आज 110 लोकल फेऱ्या रद्द असणार आहे. मात्र, सोमवारपासून पश्चिम रेल्वे मार्गावर नियमितपणे लोकल धावणार आहेत. लवकरच सहावी मार्गिका प्रवासी सेवेत येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत. डहाणू रोड स्टेशनवर अपग्रेशन काम सुरू असल्याने काही रेल्वे गाड्या प्रभावित होणार आहे.


मध्यरेल्वे मार्गावर मेगाब्लॉक


ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणार्‍या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि दादर येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर दुहेरी थांबा देण्यात येईल. याकाळात नियोजित आगमनापासून 10 ते 15 मिनिटे उशीराने गाड्या धावणार आहेत. ब्लॉक कालावधीत डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते भायखळा दरम्यान डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येतील आणि दादर येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दुहेरी थांबा देण्यात येईल आणि इगतपुरी, लोणावळा आणि रोहा येथे त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशीराने पाहचतील.


हार्बर मार्गावर मेगाब्लॉक


हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून पनवेल/बेलापूरसाठी आणि पनवेल/ बेलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप आणि डाऊन मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला स्थानकांदरम्यान विशेष उपनगरीय गाड्या धावणार आहेत. तसेच ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत उपलब्ध असतील.


दरम्यान, मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरील आजचा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज जम्बो मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.