मुंबई : मुंबई महानगरातील वायू प्रदूषण (Mumbai Air Pollution) आणि त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाने सक्रिय पावले उचलली आहेत. बांधकाम - पाडकामाचा राडारोडा वाहतूक करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरे मिळून शुक्रवार, दिनांक 3 ते रविवार 5 नोव्हेंबर 2023 रोजी पर्यंत एकूण 4 लाख 71 हजार 692 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या पुढील काळातही दंडात्मक कारवाई सुरू राहणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राडारोडा वाहतूक करताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध वाहनांवर दंडात्मक कारवाई करत एकूण 4 लाख 71 हजार 692 रुपयांचा दंड तीन दिवसात वसूल करण्यात आला आहे. यामध्ये, जी दक्षिण विभागात 15 हजार रुपये, पी उत्तर विभागात 80 हजार रुपये, एन विभागात 70 हजार रुपये, एस विभागात 45 हजार 692 रुपये, टी विभागात 50 हजार रुपये , पी दक्षिण विभागात 13 हजार रुपये, के पश्चिम विभागात 10 हजार रुपये, एफ उत्तर विभागात 45 हजार रुपये, जी उत्तर विभागात 10 हजार रुपये असा एकूण 4 लाख 71 हजार 692 रुपयांचा दंड रकमेचा समावेश आहे.
मुंबई महानगरातील वायू प्रदूषण व त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना राबवण्याची सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये युद्ध पातळीवर विविध कामे सुरु करण्यात आली आहेत.
यामध्ये सरकारी, निमसरकारीसह खासगी बांधकामांद्वारे होणारे वायू प्रदूषण तसेच धूळ नियंत्रण कामे याचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. सर्व संबंधित यंत्रणांसाठी ही मार्गदर्शक तत्वे अनिवार्य असून त्यांचे पालन न करणाऱ्या संबंधितांवर सक्त कारवाईचा इशारा महानगरपालिकेने दिला आहे.
राडारोडा वाहून नेणाऱ्या वाहनांनी काय करावे?
महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार , बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकलेली असावीत (वरच्या बाजूने आणि सर्व बाजूंनीसुद्धा). जेणेकरून वाहतुकीदरम्यान बांधकाम साहित्य किंवा राडारोडा यांचे कण हवेत मिसळणार नाहीत. वाहनातून मर्यादेपेक्षा अधिक वजनाचे साहित्य वाहून नेऊ नये, जेणेकरुन वाहतुकीदरम्यान ते पडण्याचा धोका राहणार नाही.
प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी, परिसरात निर्माण होणारा बांधकाम आणि पाडकाम राडारोडा हा मुंबई महानगरपालिकेच्या बांधकाम आणि पाडकाम मलबा व्यवस्थापन आराखड्यानुसार, निर्देशित केलेल्या ठिकाणीच नेला जावा. राडारोडा उतरवल्यानंतर, वाहन पूर्णपणे धुऊन स्वच्छ केले पाहिजे. महानगरपालिकेच्या सर्व 24 विभाग कार्यालयांनी या कामी भरारी पथके गठीत केली आहेत.
हवा गुणवत्ता निर्देशांकनुसार धुळीचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत असलेले सूक्ष्म धूलिकण नियंत्रित करण्याच्या दृष्टीने दंडात्मक उपाययोजना देखील आता करण्यात येत आहेत. राडारोडा वाहून नेणारी वाहने, बांधकाम ठिकाणे व त्याजवळील सार्वजनिक ठिकाणे येथे आवश्यक ती उपाययोजना न राबविल्यामुळे झालेले प्रदूषण यावर नियंत्रण आणणे, हा यामागील उद्देश असल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.