पालघर: कोरोना संक्रमण काळात मानवाला इतरत्र फिरण्यास बंधनं असली तरीही पक्ष्यांना मात्र बंधनं नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनुष्यांना स्थलांतराचे निर्बंध असले तरी हे निर्बंध पशुपक्ष्यांना लागू होत नाही आणि याची प्रचिती पालघर मध्ये दिसून आली आहे. पालघरमधील पश्चिम किनारपट्टी भागातील वाढवण किनारपट्टी भागात नवरंग म्हणजेच इंडियन पिट्टा हा स्थानिक स्थलांतरीत पक्षी दिसून आला आहे. या पक्षाचा वावर भारतासह श्रीलंका आणि पश्चिम आशियाई देशात दिसून येतो.
यातील काही पक्षी हे विणीच्या हंगामात त्यांच्या घरट्यांसह दिसून आले आहेत. तांबड्या छातीची हरोळी, कलहंस, नीलिमा, नवरंग, काळ्या डोक्याचा खंड्या, हळदीकुंकू बदक, नकेर, चातक, लाल कंठाची तिरचिमणी, चिंबोरी खाऊ, रेड नेक फॅलेरोप, पलास गल, उलटचोच तुतारी, सफेद मोठा कलहंस, रंगीत तुतारी, ग्रे-प्लॉव्हर , रिंग -प्लॉव्हर कास्पियन प्लॉव्हर या सारखे इतर समुद्रपक्षी आणि पाणथळ भागात दिसणारे पक्षी वाढवण आणि पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागांत आणि पाणथळ भागांत दिसतं असतात.
समुद्र मार्गे ओमानहून उडान घेऊन थंडीच्या महिन्यात वाढवण किनारी चिंबोरी खाऊ, तसेच उत्तर अमेरिकेहुन रेड नेक फॅलेरोप, तर मंगोलियाहून उडाण घेऊन कलहंस हा पक्षी वाढवण मधील पाणथळ भागात दिसून आला आहे. उत्तर अमेरीकेहून रेड नेक फॅलेरोप हा पक्षी चिंचणी भागातील पाणथळ भागांत दिसून आला आहे तर पक्षांप्रमाणे इतर 40 हून अधिक स्थलांतरित पक्षीपालघर जिल्ह्यात दिसून आले आहेत.
पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागांत विविध स्थलांतरित पक्षी दरवर्षी येतात याचे कारण म्हणजे की आपला संपूर्ण किनारा हा खडकाळ असून येथे माशांना बिजोत्पादनाला अनुकूल असा भाग असल्याने या भागात मासे प्रजननासाठी येत असतात. त्याच प्रमाणे हा खडकाळ भाग असल्याने या भागात लहान खेकडे, शिंपल्या, खूबे हे आढळून येतात तर काही भागात चिखल असल्याने छोटे मासे व इतर लहान समुद्र जीव असल्याने या पक्ष्यांना मुबलक असा अन्नसाठा उपलब्ध असतो. त्याच प्रमाणे पालघर जिल्ह्यातील वसई पासून ते झाई बोर्डी या किनाऱ्यांवर झाडा झुडुपांचे काहीसे प्रमाण असल्याने हे पक्षी आपल्या भागातील किनाऱ्यांवर दिसत असतात.
पालघर जिल्ह्यातील दातीवरे, नांदगाव , दांडी , उनभात, चिंचणी, वरोर, वाढवन, बोर्डी झाई या किनारपट्टी भागात नॉन डिस्टर्बिंग भाग म्हणजेच कमी रहदारीचा भाग असल्या कारणामुळे हे पक्षी येथे ऑगस्टपासून दिसायला सुरुवात होत असते. यापैकी दातीवरे आणि वाढवण किनाऱ्यावर असे पक्षी हमखास दिसत असतात. सुमारे 40 हुन अधिक पक्षांचा या किनाऱ्यांवर वावर आढळून येत आहे.
पक्षी निरीक्षक प्रवीण बाबरे सांगतात, अशा स्थलांतरित पक्ष्यांच्या ठिकाणांचे जतन करणे गरजेचे आहे. सध्या पालघर जिल्हयात औद्योगिकी कारणानं खूप वेग आला आहे. त्यामुळे एमआयडीसी क्षेत्रात नवनवीन कारखाने उभारले जात आहेत. वाढते औद्योगिकीकरण ही काळाची गरज असली तरी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नदी-नाले समुद्रकिनारे यांचे जतन करणे गरजेचे आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जल आणि वायू प्रदूषण पालघर जिल्ह्यात होत असल्याचे दिसून येत आहे.
त्याचप्रमाणे बोईसर आणि पालघर तालुक्यातील एमआयडीसीमध्ये वायुप्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. निसर्गाचा समतोल बिघडवणाऱ्या या सर्व घटनांना वेळीच थांबवणे गरजेचे आहे. असे झाले नाही तर येणाऱ्या पुढील काही वर्षांमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये समुद्रकिनारी व पाणथळ भागांमध्ये प्रदूषणाचा प्रभाव वाढत जाईल आणि त्यामुळे या किनारी असे स्थलांतरित पक्षी येणे कमी होत जाईल.