मुंबई : पत्नीसोबत जबरदस्तीनं, इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध प्रस्थापित करणं बेकायदेशीर नाही, असा निर्वाळा देत मुंबई सेशन कोर्टानं आरोपी पतीला जामीन मंजूर केला आहे. मुंबई सेशन कोर्टाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांनी म्हटलं आहे की,  एक महिलेने आपल्या पतीविरुद्ध तिच्या इच्छेच्या विरोधात जाऊन जबरदस्तीनं शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप केला आहे. मात्र हे कोणत्याही कायदेशीर चौकशीचं प्रकरण नाही, असं न्यायाधीशांनी म्हटलं आहे. 


तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सदर महिलेचं मागील वर्षी 22 नोव्हेंबर रोजी लग्न झालं होतं. त्या महिलेनं तक्रार दाखल केली होती. यात म्हटलं आहे की, लग्नानंतर सदर महिलेवर पती आणि सासरच्या लोकांनी अनेक बंधनं घालायला सुरुवात केली. सोबतच टोमणे मारणे, शिविगाळ करत पैशांची मागणी देखील केली. महिलेनं आरोप केला आहे की, लग्नाच्या एका महिन्यानंतर पतीनं तिच्यासोबत जबरदस्ती शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तिनं म्हटलं की,   2 जानेवारीला ते दोघे महाबळेश्वरला गेले होते. तिथं पतीनं जबरदस्तीनं शारिरीक संबंध प्रस्थापित केल्यानं तिला अस्वस्थ वाटू लागलं आणि ती डॉक्टरांकडे गेली. त्यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर तिच्या कमरेखालील भागात लकवा मारल्याचं सांगितलं, असं महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.  


यानंतर या महिलेनं पती आणि अन्य लोकांच्या विरोधात मुंबईत तक्रार दाखल केली. यानंतर तिच्या पतीनं अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. सुनावणी दरम्यान पती आणि त्याच्या परिवारानं सांगितलं की, आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. आम्ही हुंड्याची वगैरे मागणी कधीच केली नाही.  


न्यायधीशांनी यावर सांगितलं की, पती होण्याच्या नात्यानं यात त्यानं काही चुकीचं केलेलं नाही. न्यायाधीशांनी म्हटलं की, महिलेनं हुंडा मागितल्यासंदर्भात तक्रार केली आहे. मात्र किती हुंडा मागितला याची माहिती दिलेली नाही. तसेच जबरदस्ती शारिरीक संबंधाला काही कायदेशीर आधार नाही.