Mumbai : भारतीय रेल्वेत प्रथमच, मध्य रेल्वेनं चारचाकी गाड्यांची वाहतूक करण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या बाजूनं उघडता येणारे आणि इतर सुधारित वैशिष्ट्यांसह एक प्रोटोटाइप डबा विकसित केला आहे.  गेल्या वर्षी, आरडीएसओ आणि ऑटोमोबाईल उत्पादकांच्या सहकार्यानं वापरातून काढून टाकलेल्या आणि वापरात नसलेल्या प्रवासी डब्ब्यांपासून मध्य रेल्वेने 110 किमी प्रति तास वेग क्षमता आणि 18 टनाच्या जास्त भार क्षमता असलेला हा डबा आहे. साइड एंट्रीसह 18 टनाचा अधिकचा भार वाहून नेण्याची क्षमता असलेले हे सर्वत्र उपयोगी होणारे डब्बे केवळ विविध प्रकारच्या गाड्यांसाठीच नव्हे तर पार्सल वाहतूकीसाठी देखील वापरले जाऊ शकतात. आरडीएसओ, लखनौ यांच्या संयुक्त विद्यमाने हे डबे मध्य रेल्वेच्या परळ वर्कशॉपद्वारे केवळ 30 दिवसांच्या विक्रमी वेळेत विकसित करण्यात आले आहेत. काल (मंगळवार) मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे या प्रोटोटाइप कोचचे निरीक्षण केले. मध्य रेल्वेवर ऑटोमोबाईल वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्ष 2019-20 मध्ये 118 डबे लोड केले गेले होते, जे 2020-21 मध्ये वाढून 287 डबे झाले. या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत मध्य रेल्वेने 200 गाड्या वाहून नेणारे डबे लोड केले जे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या (86 डबे) तुलनेत 133% अधिक आहेत. त्यामुळे हा नवीन प्रोटोटाईप डब्याचा खूप फायदा मध्य रेल्वेला होईल अशी माहिती अनिल कुमार लाहोटी यांनी दिली. 


 हाय स्पीड ऑटोमोबाईल कॅरियर (एनएमजीएच) यांची वैशिष्ट्ये :


• रूंद उघडणारे दरवाजे
• चेकर्ड शीटसह मजबूत फ्लोरींग 
• नैसर्गिक पाईप लाईट 
• मार्गदर्शनासाठी फरसबंदी मार्कर आणि रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप. 
• सहज प्रवेशासाठी फॉल प्लेटची सुधारित व्यवस्था 
• लॉकिंग सुलभतेसाठी बॅरल लॉकसह टोकाकडील दरवाजाचे सुधारित डिझाइन


ऑटोमोबाईल प्रामुख्याने पुणे विभागातील चिंचवड, भुसावळमधील नाशिक, नागपुरातील अजनी आणि मुंबई विभागातील कळंबोली येथून लोड केले जातात.  पारंपारिकरित्या, फतुआ, चांगसरी, चितपूर, हटिया इत्यादींसाठी  ऑटोमोबाईल लोड केले गेले आहेत, परंतु अलीकडे, फर्रुखाबाद, ओखला, कपिलास रोड इत्यादी नवीन ठिकाणे जोडली गेली आहेत.  चिंचवड, अजनी आणि कळंबोली येथून बांगलादेशला मोटारींची निर्यातही करण्यात आली आहे.