मुंबई: मुंबई उपनगर परिसरात सोमवारी रात्री एक विचित्र घटना समोर आली. घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर (Ghatkoper Andheri Link Road) फ्लेमिंगो पक्ष्यांच्या मृतदेहांचे मोठ्याप्रमाणावर अवशेष आढळून आले. घाटकोपर पूर्व परिसरात रस्त्यावर अचानक फ्लेमिंगो पक्षांची मृत कलेवरं दिसून आली. या फ्लेमिंगोंचा (Flemingo birds) मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु, फ्लेमिंगो पक्ष्यांचा थवा आकाशात उडत असताना एखाद्या विमानाची धडक लागून अख्खा थवाच मृत्युमुखी पडला असावा, अशी शक्यता पक्षीप्रेमींनी बोलून दाखवली आहे. मात्र, काहीजण फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू विमानाच्या धडकेने होणे शक्य नाही, असेही सांगत आहेत. मुंबई विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वी विमाने घाटकोपर परिसरातून जातात. त्यामुळे विमाने कमी उंचीवरुन उडत असतात. त्यामुळे विमानाच्या धडकेने फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. 


नेमकं काय घडलं?


मुंबईच्या खाडीवर येणारे गुलाबी रंगांचे फ्लेमिंगो पक्षीप्रेमींच्या आकर्षणाचा विषय असतात. पण सोमवारी रात्री घाटकोपर अंधेरी लिंक रोड वर मोठ्याप्रमाणात आकाशातून मृत फ्लेमिंगो आणि त्यांचे छिन्नविछिन्न अवशेष पडल्याने एकच भीतीचे वातावरण पसरले होते. फ्लेमिगोंच्या शरीराचे तुकडे आणि पिसं रस्त्यावर इस्ततत: विखुरली होती. 20 ते 30 फ्लेमिंगो मृत होऊन आकाशातून खाली पडले. घटनास्थळी पोलीस, पक्षी मित्र दाखल झाले असून या फ्लेमिंगोच्या मृत्यूचा शोध घेत आहेत. मात्र स्थानिक नागरिक आणि पक्षी मित्रांच्या मते हा फ्लेमिंगोचा थवा विमानाच्या मार्गात आला असावा आणि त्याची धडक बसून संपूर्ण थव्यातल्या पक्षांचा धडकेने मृत्यू होऊन ते खाली कोसळले असावेत.मात्र, या घटनेमुळे घाटकोपरमध्ये भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे.


नवी मुंबईत फ्लेमिंगो पक्षांचा अधिवास धोक्यात


नवी मुंबई शहराच्या एका बाजूस विस्तीर्ण असा खाडी किनारा पसरला असल्यानं या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येनं फ्लेमिंगो पक्षी येतात. नेरूळ येथील चाणक्य तलाव आणि डिपीएस स्कूलच्या शेजारील तलावात फ्लेमिंगो पक्षी मोठ्याप्रमाणावर उतरतात. मात्र, फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवास असलेल्या परिसरावर खासगी विकसकांची वक्रदृष्टी पडली आहे. या खासगी बिल्डर्सकडून फ्लेमिंगो पक्षांसाठी आरक्षित असलेली पाणथळ जागा निवासी संकुल बांधण्यासाठी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जवळपास 300 हेक्टर पाणथळ जागेवरील आरक्षण उठवून येथे निवासी क्षेत्र उभा राहणार आहे. याविरोधात पर्यावरणप्रेमींना आवाज उठवला आहे.  


आणखी वाचा


फ्लेमिंगो सिटी म्हणून नावारूपास येण्याआधीच मनपाचा फ्लेमिंगो अदिवासावर घाला; पाणथळ जागेवर सिमेंटच्या इमारती