मुंबई : मुंबईतील आगीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. कमला मिल अग्नितांडवाची घटना ताजी असताना आज (सोमवार) सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई सत्र न्यायालय परिसरात आग लागली.

मुंबई सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सध्या तिथं अग्निशमन दलाचं कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, सकाळची वेळ असल्यामुळे न्यायालयाची ही इमारत बंद होती. त्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मुंबईत वारंवार आगीच्या घटना घडत असल्यानं नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.