डोंबिवली : रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी डोंबिवलीतल्या एम्स हॉस्पिटलची तोडफोड केली. यावेळी हॉस्पिटलच्या एका कर्मचाऱ्यावरही हल्ला चढवत धारदार शस्त्राने वार करण्यात आले.
डोंबिवलीजवळच्या निळजे गावात राहणाऱ्या नीलम पाटील या 25 वर्षीय महिलेला काल मध्यरात्री एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्याने प्रकृती नाजूक असतानाच आज दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
याला हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत मृत महिलेच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. यावेळी तिथे असलेले हॉस्पिटलचे कर्मचारी अजय जाधव यांनाही लक्ष्य करत जमावाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे त्यांच्यावर एम्स हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या सगळ्याप्रकरणी एम्स हॉस्पिटलने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून असंच सुरू राहिलं, तर यापुढे गंभीर पेशंट घेताना आम्ही विचार करू, अशी उद्विग्न प्रतिक्रिया एम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी दिली आहे.
तर कल्याण डोंबिवलीतला हा हॉस्पिटलची तोडफोड करण्याचा महिन्याभरातला दुसरा प्रकार असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय विश्वस्त डॉ. मंगेश पाटे यांनी केली आहे. या सगळ्याबाबत मृत महिलेच्या नातेवाईकांनी मात्र माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.