बीपीसीएल प्लान्टमध्ये स्फोट मुंबई: चेंबूर-वडाळ्याजवळ भारत पेट्रोलियम रिफायनरीमधील (बीपीसीएल) हायड्रोक्रॅकर प्लान्टमध्ये स्फोट झाल्यामुळे माहुलगाव परिसर हादरला. या स्फोटामुळे लागलेली आग कित्येक तास धुमसतच आहे. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. या प्लान्टमध्ये शेकडो कामगार अडकले होते, त्यापैकी 41 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की दूरपर्यंत तो ऐकायला गेला.


बीपीसीएल रिफायनरीच्या बॉयलरमध्ये दुपारी 2 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास स्फोट झाला. स्फोटानंतर आग आणि धुराचे लोट पसरले. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या 30 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न करत होते.

वडाळ्याजवळ मोठे पेट्रोकेमिकल प्लान्ट आहेत. त्यामुळे हा परिसर अतिशय संवेदनशील आहे. दुसरीकडे या परिसरात मोठी झोपडपट्टी आहे. तिथे हजारो लोक राहतात. त्यामुळे इथे पेट्रोकेमिकल प्लान्टची आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. सुमारे 300 कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे.

चेंबूर, कुर्ला, वडाळामधील अग्निशमन दलाच्या गाड्या, तसंच जवळपास 30 अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कंपनीपासून काही अंतरावरच टाटा थर्मल प्लान्ट आहे. आजूबाजूला दाटीवाटीची वस्ती आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.


बीपीसीएल कंपनी महत्त्वाची का?

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात बीपीसीएल कंपनी भारत सरकारद्वारे नियंत्रित केली जाते. डी. राजकुमार हे बीपीसीएलचे विद्यमान चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. मुंबईत बीपीसीएलचं मुख्यालय आहे. तेल आणि गॅस निर्मिती करणारी ही कंपनी असून, मुंबई आणि कोचीनमध्ये दोन सर्वात मोठ्या रिफायनरी आहेत.

जगातील 'महाकाय 500 कंपन्यांच्या यादीत 2016 साली 'फॉर्च्युन' मासिकाने बीपीसीएलला 358 वं स्थान दिलं होतं.

24 जानेवारी 1976 रोजी बर्मा शेल ग्रुप ऑफ कंपनीला भारत सरकारने टेकओव्हर केलं आणि 'भारत रिफायनरिज लिमिटेड' अशी कंपनी स्थापन केली. त्यानंतर 1 ऑगस्ट 1977 रोजी केंद्र सरकारने या कंपनीचे 'भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड'  अर्थात बीपीसीएल असे नामकरण केले.

भारतात बीपीसीएलच्या चार मोठ्या रिफायनरी आहेत :

1. मुंबई रिफायनरी (वर्षिक 13 MMT क्षमता)
2. कोचीन (केरळ) रिफायनरी (वार्षिक 15.5 MMT क्षमता)
3. बिना (मध्य प्रदेश) रिफायनरी (वार्षिक 6 MMT क्षमता) - या रिफायनरीची ओमान ऑईल कंपनीसोबत जॉईंट व्हेंचर आहे.
4. नुमालिगढ (आसाम) रिफायनरी (वार्षिक 3 MMT क्षमता)

पेट्रोलियम आणि पेट्रोलियम उत्पादनांचं संशोधन (exploration), निर्मिती (production) आणि विक्री (retailing) असं बीपीसीएलच्या कामाचं क्षेत्र आहे. पेट्रोलियम क्षेत्रातील बीपीसीएलचं नेटवर्क सर्वात भक्कम आणि मोठं असल्याचं मानलं जातं.

स्फोट, आगीचा घटनाक्रम आणि बीपीसीएलची माहिती

-BPCL रिफायनरी च्या माहुल प्लान्टमधील दुपारी 2 वा. 45 च्या सुमारास स्फोट

-स्फोटानंतर हायड्रोक्रॅकर प्लान्टच्या कम्प्रेसर शेडमध्ये आग लागली

-आगीनंतर तातडीने रिफायनरीच्या अग्निशमन टीमने युद्धपातळीवर आग विझवण्याचं काम सुरु केलं

-स्फोटानंतर सुमारे तासभर आगीचा भडका सुरुच, तासाभरानंतर आगीवर नियंत्रण

-स्फोट आणि आगीत दोन जण किरकोळ जखमी. त्यांच्यावर रिफायनरी मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरु.

LIVE UPDATE


41 कर्मचारी जखमी, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती


25 पेक्षा जास्त अॅम्ब्युलन्स घटनास्थळी, आगीत अनेक कर्मचारी जखमी झाल्याची शक्यता, सुमारे 300 कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवलं

फर्स्ट शिफ्टमधील 500 ते 600 कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवलं, नेटवर्क नसल्याने फोन लागत नाही

कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढलं, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु : खासदार राहुल शेवाळे

बीपीसीएल रिफायनरीच्या बॉयलरमध्ये दुपारी 03 वाजून 03 मिनिटांनी स्फोट, स्फोटानंतर आग आणि धुराचे लोट, अग्निशमन दलाच्या 15 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल

अडकलेले कामगार बाहेर काढण्याचं काम सुरु, मनुष्यहानी झाल्याचा अंदाज, शिवसेनेचे स्थानिक आमदार तुकाराम काते यांची माहिती, सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

कंपनीत 200 ते 300 कर्मचारी अडकून, सर्वांचे फोनही संपर्काबाहेर,  शिवसेना आमदार तुकाराम काते यांची माहिती

कंपनीपासून काही अंतरावरच टाटा थर्मल प्लान्ट, आजूबाजूला दाटीवाटीची वस्ती

VIDEO: