Mumbai Trident Building Fire : मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलच्या (Trident Hotel) इमारतीला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मरीन ड्राईव्ह येथील ट्रायडंट हॉटेलच्या (Hotel Trident Fire) इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावरून धुराचे लोळ पाहायला मिळाले. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रायडंट हॉटेलच्या इमारतीच्या टेरेसवरून धुराचे लोळ बाहेर पडताना दिसून आले.
हॉटेल ट्रायडेंटच्या इमारतीला आग
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे 6:50 ते 7:10 च्या दरम्यान मरीन लाईन्सवरील हॉटेल ट्रायडेंटच्या टेरेसवर मजल्यावरून काळा धूर यायला सुरुवात झाली. रविवार असल्याने मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग अॅक्टिव्हीटीसाठी नागरिक जमले होते. पहाटे हॅप्पी स्ट्रीट उपक्रमासाठी येथे जमलेल्या लोकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य टिपायला सुरुवात केली. मात्र काही वेळात हा धूर येणं थांबल्याने नक्की ट्रायडेंटमध्ये काय झालं होतं हे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पंचतारांकित हॉटेलमधील आग आटोक्यात
मुंबईच्या दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये सकाळी सात वाजेच्या सुमारात आग लागली. दरम्यान, मुंबईतील पंचतारांकित हॉटेल ट्रायडंटला लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमधील अंतर्गत अग्निसुरक्षा यंत्रणेद्वारेच हॉटेलमधील आग विझवण्यात आली आहे. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. हॉटेल ट्रायडंटला लागलेल्या आगीचा तपास मुंबई अग्निशमन दल करत आहे.
आगी संदर्भात हॉटेल ट्रायडंटचं स्पष्टीकरण
मुंबईतील पंचतारांकित हॉटेल ट्रायडेंटमध्ये आज सकाळी सातच्या सुमारास हॉटेलचा चिमणीमध्ये आग लागली होती. आगीची माहिती मिळताच ट्रायडेंट हॉटेलच्या आतमध्ये असलेला फायर सिस्टममधून हॉटेल कर्मचाऱ्यांनी आग विझवली आहे. मात्र या आगीसंदर्भात ट्रायडेंट हॉटेल प्रशासनाने माहिती देताना मॉक ड्रिल केल्याचं सांगितलं आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा तीन गाड्या हॉटेल ट्रायडेंटमध्ये दाखल होऊन आग कशामुळे लागली होती या संदर्भात अधिक तपास करण्यात येत आहे.
ट्रायडेंट हॉटेलबाबत अग्निशमन दलानं काय म्हटलं?
हॉटेल ट्रायडंटने याबाबत माहिती देताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, हायराईज हॉटेलच्या इमारतीच्या 2 बेसमेंट प्लस ग्राउंडवरच्या 34 मजल्याच्या तळघरात ठेवलेल्या ट्यूब बॉयलरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे इमारतीच्या छतावरील चिमणीतून धूर निघत होता, असं हॉटेलने सांगितलं आहे. मरीन ड्राईव्हवरील पादचाऱ्यांनी सकाळी 7 वाजता आगसृश्य परिस्थिती दिसली. पण अग्निशमन दलाकडून घटनास्थळी जाऊन तपास करण्यात आला. ट्रायडंट हॉटेल प्राधिकरणासह परिसराचीही अग्निशमन दलाकडून कसून तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, हॉटेलच्या इमारतीला आग लागली नव्हती, असं अग्निशमन दलाने स्पष्टीकरण दिलं आहे.