मुंबई: आगामी बकरी ईद (Bakri Eid) सणाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या देवनार पशुवधगृहात सर्व प्रकारच्या व्यवस्थांचे चोख नियोजन करण्यात आले आहे. बकरी ईद सणाच्या कालावधीत जनावरांची अनधिकृत आयात, कत्तल आणि अनधिकृत मांस विक्री विषयक नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 9930501293 हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या क्रमांकावर नागरिकांना 30 जून 2023 पर्यंत जनावरांच्या अनधिकृत आयातींच्या, कत्तलींच्या आणि अनधिकृत मांस विक्रीबाबतच्या तक्रारीं नोंदविता येणार आहेत.      


आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या देवनार पशुवधगृहात30 जून पर्यंत जिवंत म्हैसवर्गीय प्राणी आणि बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी बकरी ईदच्या दिवशी म्हणजे 28 जून आणि त्यानंतरचे दोन दिवस धार्मिक पशूवधास परवानगी देण्यात आली आहे. धार्मिक पशूवधासाठी परवानगी देताना ती 'धार्मिक पशूवध धोरण' याच्या अधीन राहून देण्यात येते. 


तसेच दरवर्षी प्रमाणे म्हैसवर्गीय प्राण्यांचा धार्मिक वध हा केवळ देवनार पशुवधगृहातच करणे बंधनकारक आहे. या कालावधीत जनावरांच्या अनधिकृत आयातींच्या, कत्तलींच्या आणि अनधिकृत मांस विक्रीबाबत तक्रारी नागरिकांना नोंदविणे सोपे होईल आणि नियमबाह्य घटनांना आळा बसावा यासाठी महानगरपालिकेकडून सदर हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.   


राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा


बकरी ईद निमित्त राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा असा आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिला आहे. मालेगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, सातारा, धाराशिव, धुळे सोलापूरमध्ये या कायद्याचे काटेकोर अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. 


राज्यातील महिन्याभरातील घटना पाहता विधानसभा अध्यक्षांच्या पत्राला विशेष महत्व आहे. राज्यात अनेक ठिकाणी गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याचं या पत्रात सांगण्यात आलं आहे. 


बकरी ईद निमित्ताने सुरक्षा बैठक


येत्या काही दिवसात बकरी ईद सण साजरा केला जाणार आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्याबाबत सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीला अनेक प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित असणार होते. यावेळी बकरी ईदनिमित्ताने करावयाच्या सुरक्षा योजनांवर चर्चा झाली. 


ही बातमी वाचा: