कल्याण : ऐन सणासुदीच्या दिवसात फुलांचा भाव पडल्याने शेतकऱ्यांनी फुलं अक्षरशः फेकून दिली आहेत. त्यामुळे कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये रस्त्यांवर फुलांचा अक्षरशः खच पडला.


राज्यात सध्या सर्वत्र अवकाळी पाऊस पडत असून यामुळे फुलांच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. झाडांवरच ओली झालेली फुले बाजारात येईपर्यंत खराब व्हायला सुरुवात होत आहे. त्यामुळे या फुलांना 5 रुपये किलोच्या वर दर मिळत नसून यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झालेत.


फुले विक्रीसाठी नाशिकहून कल्याणला आणण्यासाठीच एका किलोमागे 7 रुपयांचा खर्च असून त्याच्यावर आम्हाला दोन तीन रुपयेही मिळणार नसतील, तर आमच्या मुलांची दिवाळी कशी साजरी होणार? असा उद्विग्न सवाल हे शेतकरी विचारत आहे.


यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी आपली फुले रस्त्यावर टाकून देत परतीची वाट धरली. तर अनेक शेतकरी नाईलाजाने मिळेल त्या दराने फुलांची विक्री करत आहेत. मात्र या सगळ्यातही अनेक जण ही फेकून दिलेली फुलंही जमा करुन विकण्यासाठी नेताना पाहायला मिळत आहे. सरकारने आम्हाला अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.