मुंबई : दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाप्रकरणी पॉपस्टार रिहानाने ट्वीट केल्यानंतर क्रीडा विश्वासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी ट्वीट करुन देशांतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप न करण्याचा सल्ला तिला दिला. ट्वीट करणाऱ्यांमध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश होता. आता सचिन तेंडुलकरच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निदर्शनं केली आहे. सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील, असा सवाल त्याला विचारण्यात आला आहे.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रवक्ते रणजीत बागल यांनी सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील वांद्रे इथल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. त्यांच्या हातातील फलकावर सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील असा सवाल त्यांनी विचारला आहे.



नेटकरी मागत आहेत शारापोव्हाची माफी, सचिन ठरतोय यामागचं कारण


सचिन तेंडुलकरचं ट्वीट
भारतातील शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर जागतिक सेलिब्रिटींनी आपलं मत मांडल्यानंतर देशातील सेलिब्रिटींनी याला विरोध केला आहे. हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरने याबाबत 3 फेब्रुवारी रोजी ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये सचिन तेंडुलकर म्हणाला होता की, "भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही." बाह्य शक्ती बघ्याच्या भूमिकेत असू शकतात. मात्र, ते सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया.




परंतु सचिनच्या या ट्वीटनंतर देशभरातील शेतकरी आंदोलनाच्या समर्थकांनी सचिनचा खरपूस समाचार घेतला. 70 पेक्षा जास्त दिवस आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत सचिनने एकही ट्वीट केला नाही. परंतु आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर सचिनने सरकारची बाजू घेणारं ट्वीट केलं, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.


Farmer Protest | शरद पवारांचा सचिनला मोलाचा सल्ला, 'आपलं क्षेत्र सोडून बोलताना.. 


त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने थेट सचिनच्या घराबाहेरच निदर्शनं करण्यात आली. आता शेतकऱ्यांबाबत कधी ट्वीट करणार असा संतप्त सवाल त्याला विचारण्यात आला आहे.


संबंधित बातम्या