मुंबई : राज्यातील विद्यापीठ, कॉलेज 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्याबाबतचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 3 फेब्रुवारीला घेतला. यावेळी कॉलेज सुरू करण्याबाबत निर्णय घेताना राज्य शासनाच्या निर्णयात प्रत्येक विद्यापीठाने स्थानिक आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासनशी विचारविनिमय करून त्या भागातील कोविड 19 चा प्रादुर्भाव पाहून स्थानिक प्राधिकरणाची सहमती घेऊन विद्यापीठाने कॉलेज सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते.
असे असताना देखील मुंबई विद्यापीठाने कॉलेज महाविद्यालय सुरू करण्याबाबत काढलेल्या परिपत्रकात ही जबाबदारी त्या त्या भागातील कॉलेज, शैक्षणिक संस्थांवर सोडली असल्याचे समोर आलं आहे. याबाबत बुक्टोने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवून यामध्ये तातडीने लक्ष घालण्यास सांगितले आहे.
परिपत्रकात मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कॉलेज, संस्था सुरू करताना स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी विचारविनामय करून कॉलेज सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा असे सांगण्यात आलं आहे. सोबतच युजीसीने ज्या गाईडलाइन्स कॉलेज सुरू करण्याबाबत दिल्या आहेत त्याचे पालन करून तो अहवाल स्थानिक प्रशासनाला कळवावा, अस या परिपत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे विद्यापीठाचे हे परिपत्रक शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता आपल्या जबाबदारीपासून पळ काढत असून मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या प्रत्येक 780 कॉलेजला स्थानिक प्रशासनाकडून परवानग्या घ्याव्या लागणार का ? असा प्रश्न बुक्टोने विचारला आहे.
कॉलेज सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जात असताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत घेतलेल्या बैठकीत विद्यापीठ सुरू करण्यापूर्वी त्या भागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचरांच्या कोविड 19 टेस्ट करण्याबाबत विद्यापीठाने स्थानिक जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले असताना मुंबई विद्यापीठ व त्या अंतर्गत येणारे कॉलेज यामध्ये शिकवणाऱ्या, काम करणाऱ्या शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कोविड 19 टेस्टबाबत काय ? असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. या परिपत्रकावर व बुक्टोने उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत मुंबई विद्यापीठाशी संपर्क साधला असता अद्याप विद्यापीठाने याबाबत स्पष्टीकरण दिलेला नाही.
राज्यातील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरु : उदय सामंत