मुंबई : क्रिकेटचा देव, अनेकांच्या गळ्यातील ताईत आणि क्रीडाविश्वातील एक मोठं नाव असणाऱ्या सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) यानं काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली. पण, त्याच्या प्रतिक्रियेनंतर मात्र एकच टीकेची झोड उठली. आता या साऱ्यामध्ये टेनिस स्टार मारिया शारापोव्हा (Maria Sharapova) हिच्याही नावानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.


लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे, अनेक नेटकरी विशेषत: केरळकडील नेटीझन्स तिची माफी मागू लागले आहेत. 2015 मध्ये तिनं एका मुलाखतीदरम्यान, सचिनसंदर्भातील प्रश्न टाळला होता. किंबहुना आपल्याला याबाबत फारशी माहिती नसल्याचं म्हणत त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. ज्यानंतर तिच्यावर भारतीय क्रीडारसिकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली.


पण, आता मात्र एकाएकी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच तिला त्यावेळी बरंवाईट बोलल्याबद्दल माफी मागितली आहे. यापैकी काहींनी तर, तिला थेट केरळ भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. कोरोनाचं संकट संपल्यानंतर त्रिसूर येथे येऊन पूरमचा आनंद घेण्याचं बोलावणं तिला पाठवलं आहे.


नेटकऱ्यांचं म्हणणं तरी एकलंस का मारिया?


'शारापोव्हा सचिन हा कोणीही असा (थोर) व्यक्ती नाही ज्याला तू ओळखलंच पाहिजेस', असाच सूर आळवत नेटकऱ्यांनी आणि मुख्यत्त्वे मल्याळी नेटकऱ्यांनी शारापोव्हाशी केलेल्या वर्तणुकीबद्दल तिची माफी मागितली आहे. आपण सचिन तेंडुलकरला ओळखत नसल्याचं म्हणत शारापोव्हानं एका मुलाखतीदरम्यान दिलेल्या प्रतिक्रियेनंतर तिच्यावर या मल्याळी नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आळवला होता. पण, आता आपल्या त्याच चुकीबाबत ते तिची माफीही मागत आहेत.


सचिनवर रोष का?


जवळपास मागील दोन महिन्यांहून अधिक काळापासून देशात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्याला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्वं आणि पाठिंबा मिळू लागला आहे. जागतिक ख्यातीच्या अनेक कलाकारांनी आणि व्यक्तींनी याबाबतची त्यांची मतं मांडली आहेत. पण, असं असतानाच हा मुद्दा जागतिक स्तरावर प्रकाशझोतात आलेला असताना देशातून मात्र भलचाच सूर आळवला जात आहे.


त्याचं उदाहरण म्हणजे सचिनचं ट्विट. हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया सचिननं दिली. त्यानं ट्विट करत लिहिलं, "भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात. मात्र, ते यात सहभागी असू शकत नाही. भारतीयांना हा देश ठाऊक आहे. तेच भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूटीनं उभे राहूया''.


In Pics | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून लोणार सरोवराची पाहणी आणि विकासाबाबत चर्चा


सचिननं ही प्रतिक्रिया दिली खरी, पण आम्ही त्याला एक खेळाडू म्हणूनच ओळखत होतो. एक व्यक्ती म्हणून आम्ही त्याला ओळखूच शकलो नाही अशा परखड शब्दांत व्यक्त होत मास्टर ब्लास्टरच्या या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांनी सडकून टीका केली.